GRAMIN SEARCH BANNER

पाकिस्तानच्या ‘मर्मा’वर घाव घालून ‘वर्मा’ने लावला ‘तिलक’; भारतीय संघाने कोरले 9 वेळा आशिया चषकावर नाव

Gramin Varta
398 Views

त्या पाकिस्तानीच्या हस्ते ट्रॉफी घेण्यास भारतीय संघाचा नकार

मुंबई : आशिया कप स्पर्धेत कर्णधार सूर्यकुमार यादवच्या नेतृत्वाखाली भारताने जेतेपदावर नाव कोरलं. अंतिम सामन्यात भारताने पाकिस्तानला ५ गडी आणि २ चेंडू राखून धूळ चारली. या विजयासह भारताने आशिया कप स्पर्धेवर नवव्यांदा नाव कोरलं आणि गतविजेत्याचं टायटल कायम ठेवलं. या सामन्यात पाकिस्तानच्या तोंडातून घास हिसकावून घेण्यात आला. पाकिस्तानच्या मर्मावर घाव घालून एकट्या तिलक वर्माने विजयश्री खेचून आणण्यात मोलाची भूमिका निभावली. अखेरीस त्याने आशिया चषकावर विजयाचा तिलक लावला.

या ऐतिहासिक विजयात टिळक वर्माने महत्त्वाची भूमिका बजावत भारतीय विजयावर ‘तिलक’ लावला. संपूर्ण स्पर्धेत त्याने आक्रमक फलंदाजी करत पाकिस्तानविरुद्ध निर्णायक धावा काढल्या. अंतिम सामन्यातही त्याच्या खेळीमुळे संघाचा आत्मविश्वास दुणावला.

भारताने संपूर्ण स्पर्धेत पाकिस्तानवर आक्रमक पवित्रा कायम ठेवला. साखळी फेरीत हँडशेक न करता पाकिस्तानला लायकी दाखवून दिली होती. सामन्यानंतरही पाकिस्तानने आयसीसीकडे तक्रारी करून गदारोळ केला; पण त्याचा काही उपयोग झाला नाही.

अंतिम सामन्यात नाणेफेक जिंकल्यानंतरही भारतीय संघाने ‘नो हँडशेक’ पॉलिसी कायम ठेवली. समालोचकांशी संवाद साधणे टाळले. सामना जिंकल्यानंतर खरा नाट्यमय प्रसंग बक्षीस समारंभावेळी घडला. आशियाई क्रिकेट असोसिएशनचे अध्यक्ष आणि पाकिस्तान क्रिकेट बोर्डचे प्रमुख मोहसिन नकवी यांच्या हस्ते ट्रॉफी घेण्यास भारतीय संघाने स्पष्ट नकार दिला.

सामनावीर, मालिकावीर आणि उपविजेत्या संघाचे बक्षीस वितरित झाल्यानंतरही भारतीय खेळाडू आपल्या भूमिकेवर ठाम राहिले. परिणामी नकवी यांची अवहेलना झाली आणि त्यांच्या चेहऱ्यावर निराशा उमटली. भारतीय संघाने खेळात आणि शिस्तीतही पाकिस्तानला लायकी दाखवत आशिया चषकावर ‘टिळक वर्मा’च्या चमकदार कामगिरीने विजयाची मोहर उमटवली.

Total Visitor Counter

3366970
Share This Article