रत्नागिरी : रत्नागिरी येथील नवनिर्माण हाय या सीबीएस ई शाळेच्या ‘सांस्कृतिक 2025’ वार्षिक स्नेहसंमेलन अत्यंत उत्साही व प्रेरणादायी वातावरणात पार पडले. या स्नेहसंमेलनात सन २०२५ मध्ये घडलेल्या राष्ट्रीय व सामाजिक घटनांचे प्रभावी सादरीकरण स्नेहसंमेलनाचे वैशिष्ट्य ठरले.
स्नेहसंमेलनाचे उद्घाटन इंडियन कोस्ट गार्डचे कमांडंट अमित ध्यानी यांच्या हस्ते दीपप्रज्वलन करून करण्यात आले. यावेळी नवनिर्माण शिक्षण संस्थेच्या उपाध्यक्ष डॉ. अलीमिया परकार, चेअरमन अभिजीत हेगशेट्ये, संचालिका सीमा हेगशेट्ये तसेच मुख्याध्यापक उल्हास सप्रे, पक्षी निरीक्षक तेज्या मुळे, शर्मिला पटवर्धन उपस्थित होते.
प्रमुख पाहुणे कमांडंट अमित ध्यानी यांनी विद्यार्थ्यांच्या आत्मविश्वासपूर्ण सादरीकरणाचे कौतुक केले. भारताच्या प्रगतीत तरुण पिढीची भूमिका अत्यंत महत्त्वाची असून विद्यार्थ्यांनी लहानपणापासूनच स्वयंशिस्त, मूल्ये आणि सकारात्मक दृष्टिकोन अंगीकारावा, असे त्यांनी सांगितले. अपयशाने खचून न जाता स्वप्नांच्या मागे चिकाटीने धावण्याचे आवाहन त्यांनी विद्यार्थ्यांना केले.
संस्थेचे चेअरमन अभिजीत हेगशेट्ये यांनी नवनिर्माण शिक्षण संस्थेच्या शैक्षणिक वाटचालीचा आढावा घेतला. यावेळी त्यांनी इस्रोच्या सहकार्याने ‘स्पेस लॅब’ सुरू करण्याची घोषणा केली. यामुळे विद्यार्थ्यांना अंतराळ संशोधनाच्या क्षेत्रात नवी दिशा व प्रेरणा मिळेल, असा विश्वास त्यांनी व्यक्त केला. मुख्याध्यापक उल्हास सप्रे यांनी आपल्या मनोगतात वर्षभरातील शैक्षणिक व सहशैक्षणिक उपक्रमांचा सविस्तर आढावा घेतला.
उद्घाटन कार्यक्रमात शैक्षणिक, क्रीडा व इतर क्षेत्रात उल्लेखनीय कामगिरी करणाऱ्या विद्यार्थ्यांचा मान्यवरांच्या हस्ते सत्कार करण्यात आला. यावेळी माजी विद्यार्थ्यांनी अफ्रा डिंगणकर हिंने लिहिलेल्या पुस्तकांचे प्रकाशन करण्यात.
सांस्कृतिक कार्यक्रमाची सुरुवात देशभक्तीपर ‘वंदे मातरम्’ या नृत्याने झाली. त्यानंतर भक्तिगीते, तसेच एकापेक्षा एक दर्जेदार नृत्य व नाट्यप्रयोग सादर झाले. सन २०२५ मध्ये घडलेल्या अहमदाबाद विमान दुर्घटना, भारतीय महिला संघाने पटकावलेला विश्वचषक, ऑपरेशन सिंदूर, भारतीय हॉकी संघाची उज्वल कामगिरी यांचे प्रभावी चित्रण विद्यार्थ्यांच्या नृत्याविष्कारातून साकारण्यात आले. विमान दुर्घटना व ऑपरेशन सिंदूरचे दृश्य पाहताना अनेक पालक व विद्यार्थी भावुक झाले.
राजस्थानी व पंजाबी लोकनृत्यांच्या नेत्रदीपक सादरीकरणाने उपस्थित प्रेक्षक मंत्रमुग्ध झाले. बॉलिवूड अभिनेता धर्मेंद्र यांच्या अजरामर संवादांनी सजवलेल्या ‘दिलखेचक’ नृत्याद्वारे त्यांना मानवंदना देण्यात आली.
या स्नेहसंमेलनात आत्महत्या प्रतिबंध, स्त्री शिक्षण, ऑटिझम, गरीब-श्रीमंत दरी अशा महत्त्वाच्या सामाजिक विषयांवर प्रभावी जनजागृती करण्यात आली. रामायण, ‘सावित्री तू शिक’ या नाटिकांनी विशेष लक्ष वेधले. तसेच मेधा पाटकर, राम सूतार, राज रेड्डी आणि गौरी लंकेश यांच्या व्यक्तिरेखा साकारून त्यांच्या सामाजिक व बौद्धिक योगदानाची दखल विद्यार्थ्यांनी घेतली.
एकूणच हे सांस्कृतिक स्नेहसंमेलन केवळ मनोरंजन न राहता विचारप्रवर्तक व प्रेरणादायी ठरले.
नवनिर्माण हायच्या सांस्कृतिक स्नेहसंमेलनामध्ये उमटले राष्ट्रीय आणि सामाजिक घटनांचे प्रतिबिंब








