लवकरच योग्य पर्याय काढणार ;उपअभियंता कुलकर्णी यांचे आश्वासन
लांजा : शहरातील मुंबई-गोवा महामार्गालगत उभारलेल्या अतिक्रमण हटविण्याची मोहीम राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरण विभागाने गुरुवारपासून सुरू केली होती. मात्र ही मोहीम उबाठा शिवसेनेच्या मध्यस्थीमुळे तात्पुरती स्थगित करण्यात आली आहे. व्यवसायिकांच्या मागण्यांनुसार उपाययोजना करण्याचे आश्वासन सार्वजनिक बांधकाम उपअभियंता राजेंद्र कुलकर्णी यांनी दिले आहे.
गुरुवारी, दि. ३ जुलै रोजी सकाळपासून सुरू झालेल्या या कारवाईमुळे अनेक छोटे व्यावसायिक हवालदिल झाले. लांजा शहरातील रजिस्टर्ड हॉकर संघटना आणि उबाठा शिवसेना यांनी यापूर्वीच प्राधिकरणाला कारवाई थांबवण्याची लेखी विनंती केली होती. त्यानुसार, उबाठा सेनेने व्यवसायिकांच्या बाजूने उभं राहत आंदोलनाचा इशारा दिला होता.
शुक्रवारी कारवाईचा दुसरा दिवस उजाडताच, उर्वरित अतिक्रमण हटवण्यासाठी अधिकारी पुन्हा दाखल झाले. मात्र उबाठा सेनेचे उपजिल्हा प्रमुख रवींद्र डोळस यांनी मुंबई-गोवा महामार्गावर ठिय्या आंदोलन करत अभियंता राजेंद्र कुलकर्णी यांची भेट घेतली. यावेळी डोळस यांनी सांगितले की, “दैनिक वीस रुपयांची पावती फाडून व्यवसाय करणाऱ्या छोट्या विक्रेत्यांवर अन्याय करू नका. त्यांचे पोटावर पाय ठेवू नका.” त्यांनी स्पष्ट केले की, अतिक्रमण करणाऱ्यांवर कारवाई होण्यात आम्हाला विरोध नाही, पण हातगाडी, टोपली घेऊन व्यवसाय करणाऱ्या जवळपास तीनशे लहान व्यावसायिकांना संरक्षण मिळाले पाहिजे.
रवींद्र डोळस यांच्या सोबत तालुकाप्रमुख सुरेश करंबळे, युवासेना तालुका अधिकारी अभिजीत राजेशिर्के, शिवसेना शहरप्रमुख मोहन तोडकरी, तसेच प्रवेश घारे, बाबा गुरव, नितीन शेटे, पप्पू मुळे, राजू सुर्वे, संतोष लिंगायत आदी पदाधिकारी उपस्थित होते. यावेळी अधिकार्यांशी चर्चा करतानाही डोळस यांनी लघु व्यवसायिकांच्या अडचणी आणि त्यांचा दैनंदिन चरितार्थ मांडत त्यांच्या हक्कासाठी ठाम भूमिका घेतली.
अखेर, उपअभियंता राजेंद्र कुलकर्णी यांनी सर्व बाबी लक्षात घेऊन, “वरिष्ठ अधिकाऱ्यांशी चर्चा करून लवकरच योग्य पर्याय काढला जाईल” असे आश्वासन दिले. त्यामुळे कारवाईला सध्या ब्रेक लागला असून पुढील निर्णय लवकरच घेतला जाईल, असे संकेत मिळत आहेत.