GRAMIN SEARCH BANNER

फुणगूस बसला ‘रानपाट’चा चुकीचा बोर्ड: प्रवाशांची दिशाभूल, एस.टी. प्रशासनाचे दुर्लक्ष!

Gramin Varta
887 Views

सुभाष लांजेकर यांनी दिला एसटी प्रशासनाला इशारा

संगमेश्वर: रत्नागिरी तालुक्यातील महत्त्वाचे गाव असलेल्या फुणगूसकडे धावणाऱ्या महाराष्ट्र राज्य मार्ग परिवहन महामंडळाच्या (एस.टी.) बससेवेबाबत धक्कादायक प्रकार समोर आला आहे. गेली अनेक दिवस फुणगूसच्या बसवर ‘रत्नागिरी-फुणगूस’ ऐवजी वारंवार ‘रत्नागिरी-रानपाट’ असा चुकीचा नामफलक (बोर्ड) लावला जात आहे. यामुळे स्थानिकांची आणि प्रवाशांची मोठी दिशाभूल होत असून, वारंवार तक्रारी करूनही एस.टी. प्रशासन याकडे पूर्णपणे दुर्लक्ष करत असल्याचा गंभीर आरोप ग्रामस्थांनी केला आहे.

वास्तविक पाहता, चुकीचा बोर्ड लावण्याची ही चूक थेट चालक आणि वाहकाचीच असल्याचे फुणगूस ग्रामस्थांचे स्पष्ट म्हणणे आहे. या संदर्भात यापूर्वी दिनांक २८ जानेवारी २०२५ रोजी तक्रार वहीत नोंद करण्यात आली होती. मात्र, त्या तक्रारीवर कोणतीही कारवाई झाली नाही. त्यामुळे आज संतप्त नागरिकांनी पुन्हा एकदा

चालक-वाहकांकडे चौकशी केली असता, त्यांना “फुणगूस नावाचा बोर्ड मिळत नाही” असे अत्यंत संशयास्पद आणि टोलवाटोलवीचे उत्तर मिळाले.

ग्रामस्थांनी दिलेल्या माहितीनुसार, फुणगूस-रत्नागिरी या मार्गाचा योग्य नामफलक (बोर्ड) ग्रामस्थ अमोल भोसले यांनी सुमारे एक वर्षापूर्वीच एस.टी. डेपो विभागाला उपलब्ध करून दिला होता. एवढा स्पष्ट पुरावा आणि व्यवस्था असतानाही तो बोर्ड न वापरता सातत्याने चुकीचा बोर्ड लावला जात असल्याने, प्रशासनाच्या निष्काळजीपणाबद्दल ग्रामस्थांमध्ये तीव्र नाराजी पसरली आहे.
या संपूर्ण प्रकाराची गंभीर दखल फुणगूस येथील जागरूक कार्यकर्ते सुभाष रमेश लांजेकर यांनी घेतली आहे. त्यांनी तात्काळ बसच्या चालक-वाहकांना जाब विचारला आणि याबाबत रत्नागिरी एस.टी. डेपोत स्वतः जाऊन पुन्हा एकदा लेखी तक्रार नोंदवणार असल्याचे सांगितले आहे.

बससेवा बंद होण्याची भीती!
दरम्यान, या निष्काळजी कारभाराबद्दल लांजेकर यांनी एस.टी. प्रशासनाला एक गंभीर इशारा दिला आहे. त्यांनी म्हटले आहे की, जर चुकीच्या बोर्डामुळे प्रवाशांना मार्ग कळेनासा झाला आणि ते बसमध्ये चढले नाहीत, तर हा प्रकार थेट संबंधित विभागाला रिपोर्ट स्वरूपात कळवला जाईल. तसेच, अशीच परिस्थिती कायम राहिली, तर या सकाळच्या बससेवेवरदेखील बंद होण्याची टांगती तलवार येईल. यापूर्वी पावणेचारची रत्नागिरी–फुणगूस बस अशाच दुर्लक्षामुळे बंद झाली आहे, हे एस.टी. प्रशासनाने विसरू नये,असे लांजेकर यांनी ठणकावून सांगितले.

एस.टी. प्रशासनाच्या वारंवार होणाऱ्या या निष्काळजी कारभारामुळे फुणगूसच्या प्रवाशांना दररोज प्रचंड त्रास सहन करावा लागत आहे. ग्रामस्थांनी एस.टी. प्रशासनाकडे तातडीने योग्य नामफलक लावून प्रवाशांची होणारी गैरसोय थांबवावी आणि या गलथान कारभारास जबाबदार असणाऱ्या संबंधित कर्मचाऱ्यांवर कठोर कारवाई करावी, अशी एकमुखी मागणी केली आहे.

Total Visitor Counter

3073097
Share This Article