रत्नागिरी: शैक्षणिक क्षेत्रात उत्कृष्ट काम करणाऱ्या शिक्षकांना प्रोत्साहन देण्यासाठी दिला जाणारा राज्यशासनाचा क्रांतिज्योती सावित्रीबाई फुले आदर्श शिक्षक पुरस्कारासाठी रत्नागिरी तालुक्यातील जिल्हा परिषद आदर्श प्राथमिक शाळा वाटद कवठेवाडीचे मुख्याध्यापक माधव अंकलगे यांची निवड झाली आहे.
मागील अनेक वर्षे सातत्याने अंकलगे यांनी शाळाविकास आणि विद्यार्थी गुणवत्ता विकासाच्यादृष्टीने विविध उपक्रम राबवले आहेत. त्यांनी आपल्या नोकरीच्या सेवेत विद्यार्थी गुणवत्ता विकास करतानाच पालक व समाज सहभाग यांच्या माध्यमातून व आपल्या सहकारी शिक्षकांच्या सहकार्याने दोन्ही शाळा या आदर्श शाळा पुरस्कारप्राप्त बनवल्या आहेत. मोठ्या प्रमाणावर शैक्षणिक उठाव करत शाळेत भौतिक सुविधा उपलब्ध करून घेतल्या आहेत. विविध स्पर्धा, वाचन-लेखन उपक्रम, स्पर्धा परीक्षा, आपत्कालीन काळातील सेवा, विविध शासकीय योजनांचा लाभ विद्यार्थ्यांना मिळवून देण्यासाठी घेतलेला पुढाकार, या सर्व बाबींचा विचार करून निवड समितीने त्यांची निवड या पुरस्कारासाठी जाहीर केली होती. पुरस्काराबद्दल कवी केशवसुत स्मारक व्यवस्थापन समितीचे अध्यक्ष गजानन पाटील यांनी त्यांचे अभिनंदन केले आहे.