GRAMIN SEARCH BANNER

रत्नागिरी: नगर परिषदेचा अनधिकृत बांधकामांवर ‘हातोडा’; साळवी स्टॉप येथील 12 गाळे जमीनदोस्त

Gramin Varta
170 Views

रत्नागिरी: रत्नागिरी शहरातील साळवी स्टॉप परिसरातील अनधिकृत बांधकामांवर नगर परिषदेने मंगळवारी धडक कारवाई करत ‘हातोडा’ फिरवला. जलतरण तलावाच्या मागील बाजूस न.प.च्या जागेत बेकायदेशीरपणे उभारलेले 12 गाळे आणि एक रॅम्प न.प. प्रशासनाने पोलीस बंदोबस्तात जेसीबीच्या साहाय्याने पूर्णपणे जमीनदोस्त केले.
शहरातील साळवी स्टॉप येथे मिऱ्या-नागपूर महामार्गाचे काम झाल्यामुळे यापूर्वी तेथील अनधिकृत बांधकामे हटवण्यात आली होती. परंतु, महामार्गाच्या सीमा निश्चित झाल्यानंतर, काही स्थानिक रहिवाशांनी पुन्हा पुढाऱ्यांना हाताशी धरून महामार्गाच्या सीमेबाहेर न.प.च्या जागेवर कोणतीही परवानगी न घेता बेकायदेशीरपणे 12 गाळे आणि एक रॅम्प पुन्हा उभारला होता.

या बेकायदेशीर बांधकामाबद्दल न.प. प्रशासनाकडून संबंधित व्यक्तींना वेळोवेळी नोटिसा बजावण्यात आल्या होत्या. त्याद्वारे हे बांधकाम हटविण्याच्या सूचना दिल्या होत्या. मात्र, संबंधितांनी याकडे सातत्याने दुर्लक्ष केल्याने अखेर मंगळवारी प्रशासनाकडून कठोर भूमिका घेण्यात आली.

मालमत्ता आणि बांधकाम विभागाच्या अधिकाऱ्यांनी पोलीस बंदोबस्तात ही मोठी कारवाई केली. जेसीबीच्या मदतीने 12 गाळे आणि रॅम्प पूर्णपणे हटवण्यात आले. विशेष म्हणजे, एवढ्या मोठ्या प्रमाणात बांधकाम करूनही कारवाईदरम्यान कोणीही विरोध करण्यासाठी किंवा आपले म्हणणे मांडण्यासाठी कोणीही पुढे धजावले नाहीत. त्यामुळे या कारवाईत सर्व अनधिकृत बांधकाम पूर्णपणे हटवले गेले. नगर परिषदेने शहरातील अतिक्रमणांवर आपली भूमिका स्पष्ट केल्याचे या कारवाईतून दिसून आले आहे.

Total Visitor Counter

3368900
Share This Article