संगमेश्वर: आंबा घाटातील कळकदरा परिसरात दोन गव्यांच्या झुंजीने दुर्दैवी वळण घेतले. झुंजत असतानाच दोन्ही गवा कड्यावरून खाली कोसळले आणि त्यांचा जागीच मृत्यू झाला. ही घटना आज, १४ ऑगस्ट रोजी सकाळी नऊ वाजण्याच्या सुमारास घडली.
रत्नागिरी-साखरपा-कोल्हापूर महामार्गावरील कळकदरा येथे महामार्गाच्या उजव्या बाजूला हे दोन गवा रेडे मृतावस्थेत आढळले. या घटनेची माहिती तात्काळ वनरक्षक वन उपज तपासणी नाका, साखरपा यांनी वनपाल संगमेश्वर यांना दिली.
माहिती मिळताच वनविभागाचे कर्मचारी घटनास्थळी दाखल झाले. त्यांनी पाहणी केली असता, दोन्ही गवा कड्यावरून पडून मृत झाल्याचे स्पष्ट झाले. पशुधन विकास अधिकारी यांच्या उपस्थितीत दोन्ही गव्यांचे शवविच्छेदन करण्यात आले. त्यात, झुंजीदरम्यान पडूनच त्यांचा मृत्यू झाल्याचे निष्पन्न झाले.
शवविच्छेदनानंतर वनविभागाने नियमानुसार मृत गव्यांचे शरीर सुरक्षित ठिकाणी नेऊन जाळून नष्ट केले. विभागीय वन अधिकारी गिरीजा देसाई आणि सहाय्यक वनसंरक्षक प्रियंका लगड यांच्या मार्गदर्शनाखाली ही कारवाई करण्यात आली.
यावेळी परिक्षेत्र वन अधिकारी प्रकाश सुतार, परिमंडळ वन अधिकारी न्हानू गावडे, वनरक्षक सहयोग कराडे, आकाश कडूकर, सुप्रिया काळे, सुरज तेली, तसेच इतर कर्मचारी व प्राणी मित्र उपस्थित होते.
वनविभागाने अशा घटना घडल्यास किंवा वन्यप्राणी अडचणीत सापडल्यास तात्काळ टोल फ्री क्रमांक १९२६ किंवा ९४२१७४१३३५ वर संपर्क साधण्याचे आवाहन केले आहे.