जयगडला एफ.एस.एस.ए.आय. लॅबचा प्रारंभ; हापूस, काजू, मत्स्य निर्यातीला नवे बळ

saurabhsalvi26@gmail.com
2 Min Read

रत्नागिरी: जयगड बंदर येथे प्लांट क्वारंटाईन कार्यालय आणि एनएबीएल मान्यताप्राप्त एफ.एस.एस.ए.आय. लॅब उभारण्यात आली आहे. तिचे उद्घाटन महाराष्ट्र सागरी मंडळाचे संचालक परशुराम पाटील यांनी केले.

या लॅबमुळे कोकणातील शेतकरी, मच्छीमार आणि निर्यातदारांना मोठा दिलासा मिळणार असून प्रदेशाच्या आर्थिक विकासाला नवे दालन खुले होईल,असे प्रतिपादन श्री. पाटील यांनी यावेळी केले.

महाराष्ट्र सागरी मंडळ, महाराष्ट्र इन्स्टिट्यूट फॉर ट्रान्सफॉर्मेशन (मित्रा) आणि काजू बोर्ड यांच्या संयुक्त प्रयत्नांतून जेएसडब्ल्यू जयगड बंदर येथे ही उभारणी करण्यात आली आहे. या सुविधा उभारण्यासाठी श्री. पाटील यांनी वर्षभर संबंधित केंद्रीय व राज्य शासनाच्या विभागांकडे सातत्याने पाठपुरावा केला होता.

याप्रसंगी महाराष्ट्र सागरी मंडळाचे कॅप्टन संजय उगलमुगले, प्लांट क्वारंटाइन अधिकारी सुनील पाटील, डॉ. स्वामी, एनएबीएल लॅब प्रतिनिधी श्री. गांधी, मिथिलेश देसाई तसेच शेतकरी बांधव, निर्यातदारांचे प्रतिनिधी आणि जयगड पोर्टचे अधिकारी उपस्थित होते.

या लॅबमुळे कोकण व पश्चिम महाराष्ट्रातील शेतकरी, मच्छीमार तसेच काजू व आंबा निर्यातदारांना स्थानिक स्तरावर तपासणी व प्रमाणन सुविधा उपलब्ध झाली आहे. त्यामुळे अतिरिक्त वेळ, इंधन व वाहतूक खर्च मोठ्या प्रमाणात कमी होणार आहे. जयगड बंदर भौगोलिक स्थान, सर्व हंगामात कार्यरत खोल पाण्याची क्षमता, विद्यमान वेअरहाऊस व कोल्ड स्टोरेज सुविधा आणि कोकण, कोल्हापूर, सातारा, सांगली, सोलापूर व उत्तर कर्नाटक या मागील प्रदेशाशी असलेला संपर्क यामुळे ते कृषी-निर्यातीचे महत्त्वाचे केंद्र बनण्याची क्षमता आहे. अभ्यास अहवालानुसार या माध्यमातून निर्यात लॉजिस्टिक खर्च 10 ते 15 टक्क्यांनी कमी होऊन कोकणातील कृषी उत्पादनांची आंतरराष्ट्रीय बाजारपेठेत स्पर्धात्मकता वाढणार आहे.

कोकणातील हापूस आंबा, काजू, फणस, नारळ, कोकम, मसाले तसेच मत्स्य उत्पादनांसाठी जागतिक स्तरावर ओळखला जातो. मात्र निर्यात प्रामुख्याने सुमारे 350 कि.मी. अंतरावरील जवाहरलाल नेहरू बंदरावर अवलंबून असल्याने प्रतिकंटेनर सुमारे रुपये साठ हजारापर्यंत वाहतूक खर्च तसेच किमान दोन दिवस अतिरिक्त वेळ लागतो. त्यामुळे ताजेपणावर परिणाम होतो व हंगामात मोठी गर्दी व जोखीम अशा अडचणी निर्माण होत होत्या.

Share This Article
Leave a Comment

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *