GRAMIN SEARCH BANNER

रत्नागिरीसह राज्यात गुन्हे दाखल असलेल्या ‘डिजिटल अरेस्ट’च्या सुशिक्षित सूत्रधाराला गडचिरोलीतून अटक

Gramin Varta
176 Views

अहिल्यानगर: पोलीस अधिकारी असल्याचे भासवून ‘डिजिटल अरेस्ट’ची भीती दाखवत नागरिकांकडून खंडणी उकळणाऱ्या एका उच्चशिक्षित सराईत गुन्हेगाराला अहिल्यानगर सायबर पोलीस पथकाने बेड्या ठोकल्या आहेत. रत्नागिरी आणि गोंदिया जिल्ह्यातही फसवणुकीचे गुन्हे दाखल असलेल्या चंदन दिगूराम सांगळे (वय ३०, रा. आष्टी, गडचिरोली) याला पोलिसांनी नक्षलग्रस्त भागातून पाठलाग करून ताब्यात घेतले. पदव्युत्तर अभियांत्रिकीचे शिक्षण घेतलेला हा आरोपी तांत्रिक ज्ञानाचा वापर करून इंटरनेटवरून हॉस्टेल चालक आणि लॉज मालकांची माहिती मिळवून त्यांना आपले लक्ष्य करत असे.

या प्रकरणातील तक्रारदाराला चंदनने ‘वरिष्ठ पोलीस निरीक्षक राहुल पाटील’ अशी खोटी ओळख सांगून संपर्क साधला होता. तुमच्याविरुद्ध गंभीर तक्रार आली असून, अटक टाळायची असेल तर ५ लाख रुपये द्यावे लागतील, अशी धमकी त्याने दिली होती. तांत्रिक कौशल्याचा वापर करून त्याने फिर्यादीला पूर्णपणे घाबरवून सोडले होते. याप्रकरणी सायबर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल झाल्यानंतर पोलीस अधीक्षक सोमनाथ घार्गे यांच्या मार्गदर्शनाखाली तपासाची चक्रे फिरली. तांत्रिक विश्लेषणाद्वारे आरोपीचे लोकेशन गडचिरोली जिल्ह्यातील आष्टी परिसरात असल्याचे निष्पन्न झाले.

पोलीस निरीक्षक सागर ढिकले यांच्या नेतृत्वाखालील पथक तत्काळ गडचिरोलीला रवाना झाले. आष्टी (ता. चामोर्शी) परिसरात पोलीस पथकाला पाहताच आरोपीने आपल्या स्विफ्ट कारमधून पळून जाण्याचा प्रयत्न केला, मात्र दुर्गम आणि नक्षलग्रस्त भाग असूनही पोलिसांनी मोठ्या जिद्दीने पाठलाग करून त्याला स्थानिक पोलिसांच्या मदतीने जेरबंद केले. न्यायालयाने त्याला तीन दिवसांची पोलीस कोठडी सुनावली असून गुन्ह्यात वापरलेला मोबाईलही जप्त करण्यात आला आहे. पोलीस निरीक्षक ढिकले, उपनिरीक्षक काकडे व त्यांच्या पथकाने ही धाडसी कारवाई केली असून, नागरिकांनी कोणत्याही अनोळखी व्यक्तीच्या फोनला बळी न पडता संशय आल्यास तात्काळ पोलिसांशी संपर्क साधावा, असे आवाहन प्रशासनाकडून करण्यात आले आहे.

Total Visitor Counter

3253649
Share This Article