संगमेश्वर: कळंबस्ते ग्रामपंचायतीच्या उपसरपंचपदी सर्वानुमते महम्मदशेठ दसुरकर यांची बिनविरोध निवड झाली आहे. त्यांच्या निवडीमुळे कळंबस्ते गावात आनंदाचे आणि उत्साहाचे वातावरण असून, ग्रामस्थांकडून त्यांच्यावर अभिनंदनाचा वर्षाव होत आहे.
गेली वीस वर्षांपासून ग्रामपंचायत सदस्य म्हणून सक्रिय असलेले महम्मदशेठ दसुरकर हे केवळ राजकीयच नव्हे, तर सामाजिक आणि व्यावसायिक क्षेत्रातही एक मोठे नाव आहेत. व्यावसायिक असलेल्या दसरकर यांनी अनेक गरजूंना मदतीचा हात दिला आहे. त्यांच्या प्रयत्नांमुळे अनेक तरुणांना रोजगार मिळाला असून, त्यांच्या मदतीमुळे अनेकांच्या घरात आर्थिक स्थैर्य आले आहे. मदतीसाठी कुणीही हाक मारल्यास किंवा कुणी अडचणीत असल्यास महम्मदशेठ नेहमीच मदतीसाठी पुढे सरसावतात. गेल्या प्रत्येक वर्षात त्यांच्या सामाजिक कार्यात एक वेगळाच ‘दबदबा’ निर्माण झाला आहे, असे ग्रामस्थ आवर्जून सांगतात.
दसुरकर यांच्या अनुभवाचा आणि दूरदृष्टीचा फायदा ग्रामपंचायतीच्या विकासाला निश्चितपणे होईल, असा विश्वास ग्रामस्थांनी व्यक्त केला आहे. विशेष म्हणजे, महम्मदशेठ दसुरकर यांना समाजसेवेचा आणि ग्रामपंचायतीच्या कामाचा मोठा वारसा लाभला आहे; त्यांचे वडीलही तीस वर्षांहून अधिक काळ ग्रामपंचायतीमध्ये कार्यरत होते.
या निवडीबद्दल आमदार शेखर निकम, राजेंद्र महाडिक, रचना महाडिक, बंड्याशेठ महाडिक यांच्यासह अनेक मान्यवरांनी महम्मदशेठ दसरकर यांना पुढील वाटचालीस शुभेच्छा दिल्या.
याप्रसंगी तालुकाध्यक्ष राजेंद्र पोमेंडकर तसेच शिवसेनेचे उपतालुकाप्रमुख जमूरत अलजी आणि कुरधुंडा गावचे उपसरपंच तैमूर अलजी यांच्यासह अनेक राजकीय आणि सामाजिक क्षेत्रातील मान्यवर उपस्थित होते. दसुरकर यांच्या निवडीमुळे कळंबस्ते गावाच्या विकासाला नवी दिशा मिळेल आणि प्रगतीला आणखी गती मिळेल, अशी अपेक्षा व्यक्त केली जात आहे.