काही रस्ते पाण्याखाली गेल्याने जनसंपर्क तुटला
रत्नागिरी, (प्रतिनिधी): गेल्या दोन दिवसांपासून रत्नागिरी जिल्ह्यात सुरू असलेल्या मुसळधार पावसामुळे जनजीवन विस्कळीत झाले असून, अनेक नद्यांनी पातळी ओलांडली आहे. विशेषतः बाव नदीने आपले पात्र ओलांडल्यामुळे वांद्री उक्षी परिसरात पूरसदृश परिस्थिती निर्माण झाली आहे. या परिस्थितीमुळे परिसरातील अनेकांचा संपर्क तुटला आहे.
जिल्ह्यात सर्वदूर कोसळत असलेल्या संततधार पावसामुळे नद्या-नाल्यांच्या पाण्याची पातळी झपाट्याने वाढत आहे. बाव नदीचे पाणी शेतीमध्ये आणि सखल भागात शिरले आहे. त्यामुळे परिसरातील रहिवाशांची मोठी गैरसोय होत आहे. पूरजन्य स्थितीमुळे जनसंपर्क तुटला आहे.बाव नदीच्या पुरामुळे अनेक महत्त्वाचे रस्ते पाण्याखाली गेले आहेत.यामुळे दैनंदिन कामासाठी बाहेर पडणाऱ्या नागरिकांना अनेक अडचणींना सामोरे जावे लागत आहे.
प्रशासन सध्या पूर परिस्थितीवर लक्ष ठेवून आहे. आपत्कालीन परिस्थितीचा सामना करण्यासाठी आवश्यक त्या उपाययोजना केल्या जात आहेत. तरीही, नागरिकांनी सतर्क राहावे आणि पूरग्रस्त भागातून प्रवास करणे टाळावे, असे आवाहन प्रशासनाकडून करण्यात आले आहे.
या पूरस्थितीमुळे परिसरातील शेतीचेही मोठ्या प्रमाणात नुकसान झाले आहे. अनेक ठिकाणी शेती पाण्याखाली गेल्याने शेतकऱ्यांची चिंता वाढली आहे. पावसाचा जोर कायम राहिल्यास परिस्थिती आणखी गंभीर होण्याची शक्यता आहे.
बावनदीने पात्र ओलांडले; वांद्री-उक्षी परिसरात पुरजन्य स्थिती
