रत्नागिरी: स्वराज्याची राजधानी किल्ले रायगड हे संपूर्ण देशाचे श्रद्धातीर्थ आहे. छत्रपती शिवरायांच्या पराक्रमाने पावन झालेल्या किल्ले रायगडाच्या पवित्र भूमीला जागतिक वारसास्थळाचा दर्जा मिळाल्याचे जाहीर होताच तिथे ‘मोरपंखी’ या पुस्तकाचे प्रकाशन होणे हा निव्वळ योगायोग नसून, लेखक दीपक नागवेकर यांचे सद्भाग्य आहे.
या पुस्तकाच्या प्रकाशनाला रायगडासारखे दुसरे कोणते सर्वोच्च व्यासपीठ मिळाले नसते, असे मत सुभेदार तानाजी मालुसरे यांच्या १३व्या वंशज आणि सुप्रसिद्ध अभ्यासक डॉ. शीतल मालुसरे यांनी व्यक्त केले.
रत्नागिरी जिल्हा परिषद प्राथमिक शाळा नाचणे क्र. एकचे उपक्रमशील पदवीधर शिक्षक आणि प्रसिद्ध लेखक दीपक नागवेकर यांच्या ‘मोरपंखी’ या ललित लेखसंग्रहाचे प्रकाशन आज, १३ जुलै २०२५ रोजी स्वराज्याची राजधानी किल्ले रायगडावर झाले. या वेळी सुभेदार तानाजी मालुसरे यांच्या १३व्या वंशज व अभ्यासक डॉ. शीतल मालुसरे, राजापूर लांजा तालुका नागरिक संघाचे (मुंबई) अध्यक्ष सुभाष लाड, महाडचे साहित्यिक अवि जंगम, सुप्रसिद्ध इतिहास अभ्यासक सुनील कदम, निवेदक विजय हटकर, महेंद्र साळवी, प्रकाश हर्चेकर, मंगेश चव्हाण, गणेश चव्हाण, रमेश काटकर, विराज चव्हाण आदी मान्यवर उपस्थित होते.
अवि जंगम यांनी ‘मोरपंखी’चे लेखक नागवेकर यांचे कौतुक करून साहित्यविश्वात विहार करण्यासाठी नागवेकरांनी आपले पंख अधिक बळकट करावेत, असे मत व्यक्त केले.
विद्यार्थिप्रिय उपक्रमशील शिक्षक दीपक नागवेकर प्राथमिक शिक्षक संघाचे रत्नागिरी जिल्हाध्यक्ष आहेत. शिक्षण क्षेत्रात कार्यरत असताना त्यांनी साहित्य-कला क्षेत्रातील आपले छंद जोपासले असून, विविध साहित्यिक संस्थांमध्ये ते सक्रियपणे काम करत आहेत. किल्ले रायगडावर प्रकाशित झालेल्या ‘मोरपंखी’ या ललित लेखसंग्रहाच्या प्रकाशनाला उपस्थित राहिलेल्या मान्यवरांचे आणि राजापूर लांजा तालुका नागरिक संघाच्या पदाधिकाऱ्यांचे नागवेकर यांनी आभार मानले.
दीपक नागवेकर यांच्या ‘मोरपंखी’ पुस्तकाचे रायगड किल्ल्यावर प्रकाशन
