GRAMIN SEARCH BANNER

लांजातील भडे नंबर 1 शाळेत ‘पोलिस काका आपल्या भेटीला’ उपक्रम

Gramin Varta
5 Views

लांजा : तालुक्यातील साटवली बीट अंतर्गत जिल्हा परिषद पूर्ण प्राथमिक आदर्श शाळा भडे नं.१ येथे ‘आपल्या भेटीला आपले पोलिस काका’ या पोलिस विभागाच्या उपक्रमांतर्गत एक विशेष कार्यक्रम पार पडला. या उपक्रमात बीट अंमलदार नासिर नावळेकर व सहाय्यक अंमलदार नितेश आर्डे यांनी शाळेला भेट देऊन विद्यार्थ्यांशी संवाद साधला.

कार्यक्रमाच्या सुरुवातीला शाळेच्यावतीने नासिर नावळेकर यांचा शाल, पुष्पगुच्छ व ग्रंथभेट देऊन शाळा व्यवस्थापन समिती अध्यक्ष मयुरी आडविलकर यांच्या हस्ते स्वागत करण्यात आले. त्यानंतर उपस्थित मान्यवरांचे स्वागत करून कार्यक्रमाला प्रारंभ झाला.

या भेटीदरम्यान भडे नं.१ व भडे नं.३ येथील विद्यार्थ्यांशी दोन्ही पोलिस अंमलदारांनी गुन्हेगारी, मोबाईलचा वाढता वापर, गुड टच-बॅड टच अशा महत्त्वाच्या विषयांवर दिलखुलास चर्चा केली. या संवादामुळे मुलांच्या मनातील पोलिसांविषयीची भीती दूर झाली व ते आपले दादा-काका आहेत, अशी भावना निर्माण झाली. यावेळी विद्यार्थ्यांनीही उत्स्फूर्त सहभाग घेतला होता.

या प्रसंगी भडे नं.१ चे मुख्याध्यापक लीलाधर कुड, भडे नं.३ चे मुख्याध्यापक श्रीनिवास माने, माजी सरपंच संजीवकुमार राऊत, माजी शाळा व्यवस्थापन समिती अध्यक्षा वृषाली लोखंडे, तसेच शिक्षकवृंद अभिजीत माने, संदीपकुमार खुटाळे, रूची दळी आदी उपस्थित होते.

दरम्यान, उपक्रम विद्यार्थ्यांसाठी ज्ञानवर्धक ठरला असून समाजात पोलिसांविषयी सकारात्मक दृष्टीकोन निर्माण करण्यासाठी अशा उपक्रमांचे महत्त्व अधोरेखित झाले.

Total Visitor Counter

2648224
Share This Article