दिल्लीतील लाल किल्ल्यावर होणार गौरव; गृह व संरक्षण मंत्रालयाकडून मिळणार सन्मान
चिपळूण : MyGov पोर्टलवर आयोजित करण्यात आलेल्या स्वातंत्र्य दिन चित्रकला स्पर्धेत चिपळूण येथील कु. वैदेही विशाल दिवटे हिने उत्कृष्ट कामगिरी करत उल्लेखनीय यश संपादन केले आहे. या कामगिरीबद्दल तिचा गृह मंत्रालय (MHA) आणि संरक्षण मंत्रालय (MoD) यांच्याकडून दिल्ली येथील ऐतिहासिक लाल किल्ल्यावर गौरव करण्यात येणार आहे. तिच्या या यशामुळे चिपळूणच्या शिरपेचात आणखी एक मानाचा तुरा रोवला गेला आहे.
पेढे-कोष्टेवाडी येथे राहणारी वैदेही ही चिपळूणचे प्रसिद्ध आंबा व्यापारी कै. प्रवीण नारायण दिवटे यांची नात, तर चिपळूणमधील नामांकित ‘प्रवीण शॉप अँड लेदर हाऊस’चे मालक विशाल दिवटे यांची कन्या आहे.
वैदेहीला लहानपणापासूनच चित्रकलेची विशेष आवड आहे. तिने ‘कलाविश्व’ येथे लहानपणापासून चित्रकलेचे शास्त्रशुद्ध धडे घेत आपल्या कलेला आकार दिला. सातत्यपूर्ण सराव, कल्पकता आणि मेहनतीच्या जोरावर तिने चित्रकलेत आपली वेगळी ओळख निर्माण केली आहे. MyGov पोर्टलवरील स्वातंत्र्य दिन चित्रकला स्पर्धेतील तिच्या यशाने या मेहनतीला राष्ट्रीय स्तरावर पोचपावती मिळाली आहे.
विशेष म्हणजे, वैदेही सध्या ज्ञानदीप विद्यालयात विज्ञान शाखेत शिक्षण घेत असून JEE परीक्षेची तयारीही करत आहे. अभ्यास आणि चित्रकला या दोन्ही क्षेत्रांचा समतोल साधताना तिचे वेळेचे नियोजन वाखाणण्याजोगे आहे. महाविद्यालयातून घरी परतल्यानंतर अवघी काही मिनिटे विश्रांती घेऊन ती पुन्हा बसने पॉवर हाऊस परिसरात चित्रकलेच्या सरावासाठी जात असे. अभ्यासाचा ताण सांभाळत तिने चित्रकलेसाठी दिलेला वेळ, नियमित सराव आणि घेतलेली मेहनत याचेच फलित म्हणून आज तिला राष्ट्रीय स्तरावरील हा बहुमान प्राप्त होत आहे.
दिल्लीतील लाल किल्ल्यावर होणारा वैदेहीचा गौरव हा दिवटे कुटुंबीयांसह चिपळूणकरांसाठीही अभिमानाची बाब ठरली आहे. तिच्या या यशाबद्दल विविध स्तरांतून अभिनंदन होत असून पुढील वाटचालीसाठी तिला शुभेच्छा दिल्या जात आहेत.
स्वातंत्र्य दिन चित्रकला स्पर्धेत चिपळूणच्या वैदेही दिवटेचे उल्लेखनीय यश
Leave a Comment





