GRAMIN SEARCH BANNER

राजापूर : चव्हाणवाडीचा सुपुत्र कुमार वेद बाणेची रत्नागिरी जिल्हा क्रिकेट संघात निवड

Gramin Varta
129 Views

मनोहर धुरी / राजापूर

तालुक्यातील निवेली ग्रामपंचायत कार्यक्षेत्रातील चव्हाणवाडी या छोट्याशा गावातील सुपुत्र कुमार वेद विकास बाणे याने क्रिकेट क्षेत्रात उल्लेखनीय यश मिळवले आहे. त्याची पुणे येथे होणाऱ्या 14 वर्षाखालील लेदर बॉल क्रिकेट स्पर्धेसाठी रत्नागिरी जिल्हा संघात निवड झाली असून, या यशाबद्दल वेदचे सर्वत्र कौतुक होत आहे.

माजी पोलिस पाटील कै. मारुती बाणे यांचे नातू असलेले वेद विकास बाणे हे सध्या रत्नागिरीतील प्रसिद्ध कै. छोटू देसाई क्रिकेट अकॅडमी मध्ये प्रशिक्षण घेत आहेत. अकॅडमीतील दर्जेदार प्रशिक्षण आणि मार्गदर्शनामुळे वेदने अल्पावधीतच उत्तम खेळ सादर केला आहे. या निवड प्रक्रियेत रत्नागिरी जिल्ह्यातील सुमारे 150 ते 200 गुणवंत खेळाडूंनी सहभाग घेतला होता, त्यातून वेदने आपले स्थान पक्के केले.

सध्या तो अष्टपैलू खेळाडू म्हणून ओळखला जात असून, त्याच्या गोलंदाजीचा वेग 100 ते 105 किमी प्रतितास इतका असल्याचे सांगण्यात येते. वेदचा क्रिकेटमधील आदर्श भारतीय संघाचा माजी कर्णधार विराट कोहली आहे. भविष्यात महाराष्ट्र व भारतासाठी खेळण्याचे स्वप्न त्याने व्यक्त केले आहे.

या उल्लेखनीय यशाबद्दल चव्हाणवाडी तसेच निवेली परिसरातून वेद विकास बाणे याचे अभिनंदन करण्यात येत आहे. गावकऱ्यांनी आणि क्रिकेटप्रेमींनी त्याच्या उज्ज्वल भविष्याकरिता शुभेच्छा दिल्या आहेत.

Total Visitor Counter

3199515
Share This Article