कोकणच्या शेतकऱ्याची जागतिक भरारी: लाल शेवग्याला मिळाले केंद्र सरकारचे अधिकृत पेटंट

saurabhsalvi26@gmail.com
3 Min Read

मालवण: तालुक्यातील कुंभारमाठ गावातील एका प्रयोगशील शेतकऱ्याने कृषी क्षेत्रात ऐतिहासिक कामगिरी करत भारतासह जगाचे लक्ष वेधून घेतले आहे. प्रगतशील बागायतदार उत्तम फोंडेकर यांनी स्वतःच्या संशोधनातून विकसित केलेल्या ‘लाल शेवगा’ या आगळ्यावेगळ्या वाणाला केंद्र सरकारच्या वनस्पती जातींचे संरक्षण आणि शेतकरी हक्क प्राधिकरणाने अधिकृत स्वामित्व हक्क म्हणजेच पेटंट प्रदान केले आहे. लाल रंगाचा शेवगा विकसित होण्याची आणि त्याला अशा प्रकारचे पेटंट मिळण्याची ही जागतिक स्तरावरील पहिलीच घटना असल्याचे मानले जात असून, या यशामुळे कोकणच्या शिरपेचात मानाचा तुरा रोवला गेला आहे.

उत्तम फोंडेकर हे मुळात हापूस आंबा उत्पादक म्हणून प्रसिद्ध आहेत. दरवर्षी हंगामातील हापूसची पहिली पेटी बाजारात पाठवण्याचा मान मिळवणारे फोंडेकर हे आपल्या संशोधन वृत्तीसाठी ओळखले जातात. याच आवडीतून त्यांनी काही वर्षांपूर्वी पारंपरिक हिरव्या शेवग्यापेक्षा काहीतरी वेगळे आणि अधिक पौष्टिक देण्याच्या उद्देशाने प्रयोग सुरू केले. त्यांनी ‘मोनो’ आणि ‘डाय हायब्रीड’ या संकरण पद्धतीचा वापर करून सातत्यपूर्ण निरीक्षणे आणि निवडीद्वारे हा लाल रंगाचा शेवगा आकारास आणला. या प्रक्रियेत त्यांनी केवळ रंगच नव्हे, तर झाडाची उत्पादन क्षमता आणि त्यातील औषधी गुणधर्म टिकवून ठेवण्यावर विशेष भर दिला.

या संशोधनाची दखल घेत त्यांनी कायदेशीर मान्यतेसाठी ग्रामीण कृषी मौसम सेवा केंद्राच्या मदतीने कोकण कृषी विद्यापीठाकडे प्रस्ताव सादर केला होता. त्यानंतर केंद्र सरकारच्या तज्ज्ञ पथकाने दोन वेळा प्रत्यक्ष कुंभारमाठ येथे भेट देऊन या झाडांची, शेंगांच्या लांबीची, रंगाची आणि जैविक गुणधर्मांची सखोल तपासणी केली. सर्व तांत्रिक निकष पूर्ण झाल्यानंतर अखेर नवी दिल्लीतील प्राधिकरणाने या वाणावर फोंडेकर यांच्या मालकीचा शिक्कामोर्तब केला. नुकतेच कोकण कृषी विद्यापीठामार्फत त्यांना हे अधिकृत स्वामित्व प्रमाणपत्र सुपूर्द करण्यात आले.

हा लाल शेवगा केवळ दिसायला आकर्षक नसून तो पोषणमूल्यांचा खजिना आहे. सामान्य शेवग्याच्या तुलनेत यामध्ये प्रथिनांचे प्रमाण अधिक असून जीवनसत्व ‘अ’ आणि ‘क’ सह कॅल्शियम व इतर खनिजे मुबलक प्रमाणात आढळतात. दीड ते दोन फूट लांबीच्या या शेंगांचा गर अत्यंत मऊ आणि चवदार असल्याने तो खाण्यासाठी आणि औषधी वापरासाठी उत्तम मानला जात आहे. विशेषतः मधुमेह आणि अशक्तपणा यांसारख्या समस्यांवर हा शेवगा गुणकारी ठरू शकतो, असे कृषी तज्ज्ञांचे मत आहे. भविष्यात हा वाण व्यापारी शेतीसाठी मैलाचा दगड ठरणार असून, सेंद्रिय शेती आणि आंतरराष्ट्रीय बाजारपेठेत याला मोठी मागणी मिळण्याची शक्यता आहे. एका सामान्य शेतकऱ्याने जिद्द आणि कौशल्याच्या जोरावर लावलेला हा शोध भारतीय शेतीसाठी गौरवास्पद ठरला आहे.

Share This Article
Leave a Comment

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *