चिपळूण : पोलीस ठाण्यात होमगार्ड पदावर कार्यरत असताना शिक्षणाची ओढ सोडली नाही आणि चिकाटीच्या जोरावर एल.एल.बी. पदवी मिळवत मंजुषा मधुकर पवार यांनी आपल्या आयुष्याचा टप्पा बदलला आहे. त्यांनी दाखवलेला धीर आणि समर्पण आज अनेक महिलांसाठी प्रेरणादायी ठरत आहे.
मूळच्या मार्गताम्हणे (ता. चिपळूण) येथील रहिवासी असलेल्या मंजुषा पवार या चिपळूण पोलीस ठाण्यात होमगार्ड म्हणून कार्यरत आहेत. नोकरीची शिफ्ट ड्युटी, कौटुंबिक जबाबदाऱ्या, आणि त्यातही वेळ काढून त्यांनी सातत्याने अभ्यास केला. या मेहनतीचं फलित म्हणून त्यांनी विधी शाखेतील एल.एल.बी. ही पदवी यशस्वीरित्या संपादन केली आहे.
या यशामागे त्यांची स्वतःची मेहनत, तसेच पतीचा प्रोत्साहन व कुटुंबाचा पाठिंबा हा मोठा आधार ठरला आहे. केवळ पदवी संपादनच नव्हे, तर त्यांनी आपल्या कुटुंबाचं आणि गावाचंही नाव उज्ज्वल केलं आहे.
मंजुषा पवार यांचा प्रवास हा सिद्ध करतो की, शिक्षण व स्वतःची उन्नती यासाठी वय, परिस्थिती किंवा जबाबदाऱ्या अडथळा ठरू शकत नाहीत. त्यांचे हे यश समाजातील अनेक कार्यरत महिलांना व गृहिणींना प्रेरणा देणारे आहे.
एल.एल.बी. पदवीच्या जोरावर त्या आता विधी सेवा क्षेत्रात पदार्पण करणार असून, समाजात न्याय व समतेच्या मूल्यांना बळ देण्यासाठी आपले योगदान देतील, अशी अपेक्षा व्यक्त होत आहे.
होमगार्डवरून थेट एल.एल.बी.; मंजुषा पवार यांचा जिद्दीचा प्रेरणादायी प्रवास

Leave a Comment