GRAMIN SEARCH BANNER

विवाह संस्थेवर लग्न जुळवणे पडले महागात ; संगमेश्वरातील तरुणाला महिलेने घातला साडेसहा लाखांचा गंडा

ठाण्यातील महिलेविरोधात गुन्हा, शोध सुरू

संगेमश्वर : अमरावती/नागपूर येथील एका ऑनलाइन मॅट्रिमोनियल वेबसाइटच्या माध्यमातून संगमेश्वरातील एका तरुणाची तब्बल ६ लाख ६२ हजार ६१० रुपयांची फसवणूक झाल्याचा धक्कादायक प्रकार समोर आला आहे. लग्नाचे आमिष दाखवून एका महिलेने ही फसवणूक केली असून, या प्रकरणी संगमेश्वर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. कळंबस्ते, ता. संगमेश्वर येथील रहिवासी असलेले ३२ वर्षीय नितीन प्रकाश बांबाडे यांनी लग्नासाठी अमरावती/नागपूर येथील ‘मान्यवर मॅट्रिमोनियल’ या ऑनलाइन वेबसाइटवर आपला बायोडाटा अपलोड केला होता. त्यानंतर या संस्थेकडून त्यांना ठाण्यात राहणाऱ्या प्रियंका विनोद लोणारे नावाच्या महिलेचा बायोडाटा देण्यात आला. बायोडाटा पसंत पडल्यानंतर नितीन आणि प्रियंका यांच्यात फोनवर बोलणे सुरू झाले.

बोलता बोलता प्रियंकाने लग्नाचे आश्वासन दिले आणि वेळोवेळी वेगवेगळ्या कारणांसाठी नितीनकडून पैसे मागण्यास सुरुवात केली. तिने किरकोळ खर्च, तिच्या अपेंडिक्सच्या ऑपरेशनसाठी आणि एम्ब्रॉयडरी मशीन खरेदीसाठी पैसे हवे असल्याचे सांगितले. नितीनने तिच्यावर विश्वास ठेवून तिच्या फोन नंबरशी संलग्न असलेल्या जी-पे आणि फोन-पे खात्यांवरून वेळोवेळी तिला पैसे पाठवले. त्याने जी-पे द्वारे ३ लाख १३ हजार ६१० रुपये आणि फोन-पे द्वारे ३ लाख ४९ हजार रुपये, असे एकूण ६ लाख ६२ हजार ६१० रुपये दिले. एवढी मोठी रक्कम दिल्यानंतरही प्रियंकाने ती परत केली नाही किंवा लग्नाबद्दल ठोस पाऊल उचलले नाही. पैसे परत करण्याची मागणी केल्यावर ती टाळाटाळ करू लागली. आपली फसवणूक झाल्याचे लक्षात आल्यावर नितीन बांबाडे यांनी तातडीने संगमेश्वर पोलीस ठाण्यात धाव घेतली आणि तक्रार दाखल केली. या तक्रारीनुसार, प्रियंका लोणारे हिने दिनांक ०६/०३/२०२५ ते २६/०८/२०२५ या कालावधीत ही फसवणूक केल्याचे नमूद करण्यात आले आहे. या घटनेमुळे ऑनलाइन मॅट्रिमोनियल साइट्सवर सावधगिरी बाळगणे किती महत्त्वाचे आहे, हे पुन्हा एकदा अधोरेखित झाले आहे. संगमेश्वर पोलीस या प्रकरणाचा अधिक तपास करत असून, आरोपी प्रियंका लोणारे हिचा शोध घेतला जात आहे.

Total Visitor Counter

2474804
Share This Article