पालघर: मुसळधार पावसामुळे निर्माण झालेल्या पुराच्या पाण्याने पालघर जिल्ह्यातील आंबेदे परिसरात अक्षरशः थैमान घातले आहे. यामध्ये स्थानिक पोल्ट्री व्यवसायिक निलेश पावडे यांच्या तब्बल ५ हजार कोंबड्या वाहून गेल्याने प्रचंड आर्थिक नुकसान झाल्याची माहिती समोर आली आहे.
सोमवार सायंकाळपासून सुरु असलेल्या अतिवृष्टीमुळे आंबेदे गावाजवळील ओढ्याला पूर आला. हे पाणी पावडे यांच्या पोल्ट्री फार्ममध्ये शिरले. काही तासांतच संपूर्ण शेड पाण्याखाली गेल्याने कोंबड्यांना वाचवण्याची कोणतीही संधी उपलब्ध झाली नाही. या पुरात अंदाजे ५ हजार कोंबड्या पाण्यात वाहून गेल्या.पोल्ट्री फार्ममधील खाद्यसाठा व इतर साहित्याचेही नुकसान झाले. लाखो रुपयांचे आर्थिक नुकसान झाल्याचा अंदाज व्यक्त केला जात आहे.
निलेश पावडे यांचा पोल्ट्री व्यवसाय हा त्यांच्या कुटुंबाच्या उपजीविकेचा मुख्य आधार आहे. जुलै महिन्यात कोंबड्यांचा नवीन लॉट आणून व्यवसाय वाढवण्याचा प्रयत्न सुरू होता. मात्र, अतिवृष्टीमुळे आलेल्या पुरात संपूर्ण कोंबड्या वाहून गेल्याने कुटुंबावर आर्थिक संकट कोसळले आहे.
प्रशासनाची पाहणी व मदतीची अपेक्षा…
या घटनेची माहिती स्थानिक प्रशासनाला देण्यात आली आहे. महसूल आणि पशुसंवर्धन विभागाचे अधिकारी नुकसानग्रस्त भागाची पाहणी करत आहेत. नुकसानग्रस्त कुटुंबाला तातडीने मदत मिळावी, अशी ग्रामस्थांची मागणी आहे.
एकूणच, आंबेदेतील पोल्ट्री फार्मवरील ही घटना मुसळधार पावसामुळे झालेल्या मोठ्या नुकसानीचे ज्वलंत उदाहरण ठरली आहे. तातडीने शासनस्तरावरून मदत मिळाली नाही, तर पशुपालक व पोल्ट्री व्यवसायिकांची परिस्थिती गंभीर होण्याची शक्यता आहे.
पालघर – पुराच्या पाण्यात वाहून गेल्या ५ हजार कोंबड्या
