नितीन शेट्ये यांच्या प्रवेशामुळे ठाकरे गटाला मोठे खिंडार; आमदार किरण सामंत यांच्या नेतृत्वावर दाखवला विश्वास
लांजा प्रतिनिधी : लांजा तालुक्याच्या राजकारणात दसऱ्याच्या शुभ मुहूर्तावर मोठा राजकीय भूकंप झाला आहे. उद्धव बाळासाहेब ठाकरे (उबाठा) गटाचे कडवे आणि निष्ठावान शिवसैनिक म्हणून ओळखले जाणारे नितीन शेट्ये यांनी आमदार किरण सामंत यांच्या उपस्थितीत अधिकृतपणे शिवसेना पक्षात (शिंदे गट) जाहीर प्रवेश केला. १९८४ साली लांजा तालुक्यात शिवसेनेची मुहूर्तमेढ रोवणारे ज्येष्ठ शिवसैनिक नितीन शेट्ये यांच्या या पुनरागमनामुळे ठाकरे गटाला लांजा तालुक्यात मोठे खिंडार पडले असून स्थानिक राजकीय समीकरणे पूर्णपणे बदलण्याचे संकेत मिळत आहेत.
लांजा तालुक्यात शिवसेनेचा झेंडा फडकवण्याची सुरुवात नितीन शेट्ये यांनी सुमारे ४० वर्षांपूर्वी १९८४ साली केली होती. तेव्हापासून ते सातत्याने शिवसेनेच्या विचारधारेसाठी कार्यरत राहिले आणि त्यांनी कार्यकर्त्यांमध्ये जोश निर्माण करून लांजा तालुक्यातील शिवसेनेला मजबुती दिली होती. अनेक दशकांनंतर त्यांनी आमदार किरण सामंत यांच्या नेतृत्वावर विश्वास दाखवत मूळ शिवसेनेत परतण्याचा निर्णय घेतला. या ऐतिहासिक क्षणी शेट्ये यांच्या पत्नी तेजस्विनी शेट्ये आणि मुलगा पार्थ शेट्ये यांनीही शिवसेनेचा धनुष्यबाण हाती घेतला.
आमदार किरण सामंत यांनी नितीन शेट्ये यांच्या प्रवेशाचे स्वागत करताना सांगितले की, “शिवसेना हा कार्यकर्त्यांचा पक्ष असून जनतेच्या हक्कांसाठी लढणाऱ्या प्रत्येकास या पक्षात मानाचे स्थान आहे. १९८४ पासून शिवसेनेची बीजे रोवणारे नितीन शेट्ये आज पुन्हा मूळ शिवसेनेत दाखल झाले आहेत. त्यांच्या अनुभवाचा फायदा नव्या पिढीला नक्कीच होणार आहे. त्यांचा प्रवेश हा शिवसेनेच्या ताकदीत भर घालणारा ठरेल.”
यावेळी आपले मनोगत व्यक्त करताना नितीन शेट्ये म्हणाले की, “जनतेच्या खऱ्या विकासासाठी आणि बाळासाहेब ठाकरे यांच्या खऱ्या विचारांसाठी मी पुन्हा शिवसेनेत आलो आहे. शिवसेनेसोबत माझं जुनं नातं जुळलेलं आहे आणि १९८४ साली जी मशाल पेटवली होती, ती आज पुन्हा नव्या जोमाने उजळणार आहे. आमदार किरण सामंत यांच्यासारख्या सक्षम नेतृत्वाची लांजा-राजापूर-साखरपा विधानसभा मतदारसंघाला गरज आहे. त्यांच्या नेतृत्वाखाली मतदारसंघात काम करण्याचा मला अभिमान वाटतो. यापुढेही जनतेच्या सेवेसाठी पूर्ण ताकदीने काम करू.”
शेट्ये यांचा स्थानिक पातळीवर मोठा प्रभाव असून कार्यकर्त्यांमध्ये त्यांचे विशेष स्थान आहे. त्यांच्या या प्रवेशामुळे परिसरातील शिवसेना पक्ष अधिक बळकट होणार असून कार्यकर्त्यांमध्ये नवचैतन्य निर्माण झाले आहे. या महत्त्वपूर्ण पक्षप्रवेशामुळे लांजा तालुक्यातील राजकारणात मोठी उलथापालथ होण्याचे संकेत मिळत आहेत आणि ठाकरे गटासाठी हा मोठा धक्का मानला जात आहे. या कार्यक्रमाच्या निमित्ताने विधानसभा क्षेत्र प्रमुख राजू कुरूप, प्रसन्न शेट्ये, विकास शेट्ये, मुन्ना खामकर, बाबा लांजेकर, लल्या कुरूप, नागेश कुरूप, सचिन भिंगार्डे, प्रसाद माने, समीर सावंत, बापू लांजेकर, राहुल शिंदे, श्रीनिवास शेट्ये, बंटी कुरूप, प्रवीण शेट्ये यांच्यासह अनेक शिवसैनिक उपस्थित होते.






