GRAMIN SEARCH BANNER

फॅशन आणि रेडिमेडच्या झगमगाटात टेलरिंग व्यवसाय अडचणीत

Gramin Varta
266 Views

रत्नागिरी : फॅशनच्या वाढत्या प्रभावामुळे युवकांसह सर्वसामान्य नागरिकांचा ओढा वेगाने रेडिमेड कपड्यांकडे वळत असल्याने शहरासह ग्रामीण भागातील पारंपरिक टेलरिंग व्यवसायावर मोठे संकट ओढवले आहे. ग्राहकांचा कमी होत चाललेला प्रतिसाद, गुंतून राहणारे भांडवल, तुलनेने कमी मोबदला आणि वाढती स्पर्धा यामुळे कपडे शिवून घेण्याचा पूर्वीचा कल आता लक्षणीय प्रमाणात घटताना दिसत आहे.

सध्या प्रत्येक क्षेत्रात स्पर्धा अटळ बनली आहे. रेडिमेड कपडे असोत किंवा कापड घेऊन कपडे शिवून घेणे असो, दोन्ही ठिकाणी स्पर्धा वाढली आहे. मात्र बदलत्या जीवनशैलीत आणि तत्काळ उपलब्धतेमुळे रेडिमेड कपड्यांच्या व्यवसायाला मोठी चालना मिळाली असून, त्याचवेळी विशेषतः ग्रामीण भागातील टेलरिंग व्यवसाय मात्र मेटाकुटीला आला आहे. शहरात वाढणाऱ्या रेडिमेड कपड्यांच्या दुकानांची संख्या याचे स्पष्ट उदाहरण ठरत आहे.

आधी शहरांपुरते मर्यादित असलेले रेडिमेड कपड्यांचे दुकान आता ग्रामीण भागातही मोठ्या प्रमाणात दिसून येत आहेत. मात्र त्याच तुलनेत टेलरिंग व्यवसाय करणारी दुकाने मोजकीच उरली असल्याचे चित्र आहे. एकेकाळी टेलरकडे कपडे शिवण्यासाठी ग्राहकांच्या रांगा लागायच्या. दिवसाकाठी चार ते पाच ड्रेस शिवण्याचे ऑर्डर मिळत आणि कपडे मिळण्यासाठी किमान तीन ते चार महिने वाट पाहावी लागत होती. लग्न, दिवाळी, जत्रा यांसारख्या सण-समारंभांसाठी दोन ते तीन महिने आधीच टेलरकडे नाव नोंदवावे लागत असे.

मात्र सध्याच्या रेडिमेडच्या युगात आठ-दहा दिवसांत एखादेच काम मिळत असल्याने पूर्वी जोमात असलेला हा व्यवसाय आता घरघरतो आहे. टेलरने शिवलेले कपडे रेडिमेडपेक्षा अधिक टिकाऊ आणि दर्जेदार असले तरी झगमगत्या फॅशनमुळे आजची पिढी रेडिमेडकडे अधिक आकर्षित होत आहे. परिणामी अनेक टेलरला रोजगाराच्या समस्येला सामोरे जावे लागत आहे.

सध्या ग्रामीण भागात पॅन्ट शिवण्याचा दर सुमारे ४०० रुपये, तर शर्टसाठी ३५० रुपये इतका आहे. जुन्या पिढीतील लेहंगा-सदरा, नेहरू शर्ट यासारखे खास कपडे शिवणारे टेलर आता क्वचितच आढळतात. आकर्षक डिझाइन, कमी किंमत आणि तत्काळ उपलब्धता यामुळे रेडिमेड कपड्यांकडे ग्राहकांचा वाढता ओढा दिसत असून, पारंपरिक टेलरिंग व्यवसाय दिवसेंदिवस मागे पडत चालल्याचे वास्तव समोर येत आहे.

Total Visitor Counter

3250757
Share This Article