लांजा: लांजा एसटी बस स्थानकावर बसमध्ये चढत असताना प्रवाशांच्या गर्दीचा फायदा घेऊन एका वृद्ध महिलेच्या गळ्यातील १ लाख रुपये किमतीची सोन्याची माळ अज्ञात चोराने हातोहात लांबवल्याची घटना समोर आली आहे. याप्रकरणी लांजा पोलीस ठाण्यात अज्ञात चोरट्याविरुद्ध चोरीचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
याबाबत पोलिसांकडून मिळालेल्या माहितीनुसार, लांजा तालुक्यातील रिंगणे हांदेवाडी (दत्त मंदिराजवळ) येथे राहणाऱ्या श्रीमती जयश्री एकनाथ बने (वय ७५ वर्षे) या १९ मे २०२६ रोजी दुपारी ३.१५ वाजण्याच्या सुमारास आपल्या रिंगणे गावी जाण्यासाठी लांजा एसटी स्थानकावर आल्या होत्या. त्या लांजा-झर्ये या बसमध्ये चढत असताना बसमधील प्रवाशांच्या अतोनात गर्दीचा फायदा घेत एका अज्ञात चोरट्याने त्यांच्या गळ्यातील गोल बारीक मण्यांची एक पदरी सोन्याची माळ अत्यंत चालाखीने काढून घेतली. चोरीला गेलेल्या या २६ ग्रॅम वजनाच्या सोन्याच्या माळेची किंमत सुमारे १ लाख रुपये आहे.
घटनेच्या दिवशी जयश्री बने यांची प्रकृती ठीक नसल्याने आणि त्यांना प्रचंड अशक्तपणा जाणवू लागल्यामुळे त्यांनी तातडीने पोलीस ठाण्यात न जाता घरी जाणे पसंत केले होते.
त्यानंतर प्रकृतीत सुधारणा झाल्यावर त्यांनी लांजा पोलीस ठाण्यात उपस्थित राहून या चोरीची फिर्याद दिली. फिर्यादीवरून लांजा पोलिसांनी अज्ञात इसमाविरुद्ध भारतीय न्याय संहिता (BNS) २०२३ चे कलम ३०३(२) आणि गुन्हा रजिस्टर नंबर ११६/२०२६ नुसार गुन्हा दाखल केला आहे. या चोरीच्या प्रकरणाचा पुढील अधिक तपास लांजा पोलीस करत आहेत.








