GRAMIN SEARCH BANNER

‘अंडर सी इंटरनेट केबल्स’ उद्ध्वस्त करण्याची इराणची धमकी, भीतीचे वातावरण

Gramin Varta
87 Views

तेहरान : होर्मुझ सामुद्रधुनीतून जाणाऱ्या महत्त्वाच्या ‘अंडर सी इंटरनेट केबल्स’ला उद्ध्वस्त करण्याची धमकी इराणच्या आयआरजीसी संबंधित ‘तस्नीम’ वृत्तसंस्थेने दिली आहे.

या इशाऱ्यामुळे आता जगातील अनेक देशांचा इंटरनेट संपर्क तुटण्याची भीती निर्माण झाली आहे.

एकीकडे इस्त्रायल, अमेरिका आणि इराण यांच्यातील युद्ध थांबण्याची चिन्हे दिसत नाहीत. दरम्यान आता जगातील इंटरनेट कनेक्शन धोक्यात येण्याची भीती निर्माण झाली आहे. कारण तस्नीम एजन्सीने पर्शियन आखातात समुद्राखाली असलेल्या इंटरनेट केबलचा नकाशा जारी केला आहे. त्यामुळे यावर आता उलट सुलट चर्चा सुरू झाली आहे. जर या केबल्सवर हल्ला झाला तर याचे परिणाम भारतासह जगभरातील इंटरनेटवर होऊ शकतात.

इंटरनेट केबल आणि क्लाउड इन्फ्रास्ट्रक्चरचा एक नकाशा तस्नीमने जारी केला आहे. ही पोस्ट एक इशारा म्हणून पाहिली जात आहे. पर्शियन आखातात आता डिजिटल हल्ल्याची शक्यता वर्तवली जातं आहे. बुधवारी प्रकाशित झालेल्या रिपोर्टमध्ये होर्मुझच्या सामुद्रधुनीचा उल्लेख केला आहे. फक्त होर्मुझ ऊर्जा संसाधनांच्या वाहतुकीचा मार्ग म्हणून नाही. तर समुद्राखाली असलेल्या केबल्ससुद्धा महत्त्वाच्या आहेत असं रिपोर्टमध्ये म्हटलं आहे.

इंटरनेट केबल्सचं समुद्री नेटवर्क ओमान, युएई आणि पाकिस्तानसारख्या देशांच्या लँडिंग स्टेशनमधून जातं. यातील अनेक देश युद्धाच्या छायेखाली आहेत. जगात सर्वाधिक डेटा वापरणाऱ्या देशांमध्ये आघाडीवर असलेल्या भारताची डिजिटल इकॉनॉमी या कनेक्शनवर बरीचशी अवलंबून आहे. जर हल्ला झाला तर युजर्सच्या इंटरनेट स्पीडवर परिणाम होऊ शकतो. शिवाय क्लाउड सर्विसेस आणि डिजिटल पेमेंट सेवेवरही परिणामाची शक्यता आहे.

रिपोर्टमध्ये म्हटलं आहे की, होर्मुझमधून अनेक मोठ्या केबल सिस्टिम जातात. इराणच्या तुलनेत पर्शियन खाडी या समुद्र मार्गावर जास्त अवलंबून आहे. युद्ध सुरू असताना डिजिटल इन्फ्रास्ट्रक्चर पहिल्यांदाच निशाण्यावरं आलं आहे. त्यातच आता नव्या रिपोर्टने डिजिटल हल्ल्याच्या शंकेनंतर भीती व्यक्त केली जात आहे.

इराणने याआधीही यूएई आणि बहरीनमधील ‘ॲमेझॉन वेब सर्व्हिसेस’च्या केंद्रांना ड्रोन हल्ल्यात लक्ष्य केले आहे. आता थेट इंटरनेट केबल्सनाच टार्गेट करण्याची धमकी दिल्याने, आखाती देशांच्या डिजिटल इन्फ्रास्ट्रक्चरवर मोठे संकट ओढवले आहे. यामुळे केवळ इंटरनेटच नाही, तर बँकिंग, स्टॉक एक्स्चेंज आणि सरकारी दळणवळण व्यवस्था पूर्णपणे ठप्प होऊ शकते. इराणच्या या ‘डिजिटल वॉरफेअर’च्या धमकीने जागतिक सुरक्षा यंत्रणांसमोर एक नवीन पेच निर्माण केला आहे. आता यावर अमेरिका आणि आखाती देश काय भूमिका घेतात, याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.

Total Visitor Counter

3322885
Share This Article