इंडियन हिप हॉप डान्स चॅम्पियनशिप 2026 मध्ये टॉप 12 फायनलिस्ट ठरून चिपळूणचा मान उंचावला
चिपळूण : डायडाज दि इंटरनॅशनल डान्स स्कूल, चिपळूण येथील विद्यार्थ्यांनी भारतातील सर्वात मोठ्या व प्रतिष्ठित इंडियन हिप हॉप डान्स चॅम्पियनशिप 2026 – सिझन 14 मध्ये फायनलिस्ट टॉप 12 मध्ये स्थान मिळवत राष्ट्रीय पातळीवर चिपळूण, रत्नागिरी व महाराष्ट्र राज्याचे नाव उज्वल केले आहे.
दिनांक 8 जानेवारी ते 11 जानेवारी 2026 या कालावधीत मुंबई येथे पार पडलेल्या या भव्य स्पर्धेमध्ये देशभरातील 26 राज्यांतून सुमारे 3000 स्पर्धकांची निवड करण्यात आली होती. या स्पर्धेत “दि डायडाज स्क्वॉड” या नावाने डायडाज दि इंटरनॅशनल डान्स स्कूलच्या विद्यार्थ्यांनी सहभाग नोंदवला.
पहिल्या फेरीतून दमदार सादरीकरण करत विद्यार्थ्यांनी सेमी फायनलमध्ये प्रवेश मिळवून टॉप 8 मध्ये आपली जागा निश्चित केली. त्यानंतर अंतिम फेरीत अधीरा अभिजीत लाड, काव्या दीपक चव्हाण, आराध्या दीपक चव्हाण, पूर्वा ऋषांत जाधव व भक्ती ऋषांत जाधव या अवघ्या 13 वर्षांच्या बालकलाकारांनी उत्कृष्ट कामगिरी करत फायनलिस्ट टॉप 12 मध्ये स्थान मिळवले.
विशेष बाब म्हणजे या सर्व विद्यार्थ्यांनी केवळ दोन आठवड्यांच्या सरावात हे यश संपादन केले. या संपूर्ण सादरीकरणाचे कोरिओग्राफी व मार्गदर्शन संस्थेचे संचालक व आंतरराष्ट्रीय ख्यातीचे कोरिओग्राफर श्री. सुरज विलास जाधव यांनी केले.
स्पर्धेतील सर्व मान्यवर परीक्षकांनी विद्यार्थ्यांच्या सादरीकरणाचे विशेष कौतुक केले. आंतरराष्ट्रीय परीक्षक जॉन सर यांनी विद्यार्थ्यांच्या मेहनतीचे व डायडाज डान्स स्कूलच्या दर्जेदार प्रशिक्षणाचे विशेष अभिनंदन करत पुढील वाटचालीसाठी शुभेच्छा दिल्या.
ही स्पर्धा केवळ नृत्याचीच नव्हे तर भारतातील विविध संस्कृती व प्रतिभेचे दर्शन घडवणारी ठरली. अशा राष्ट्रीय मंचावर चिपळूणमधील विद्यार्थ्यांनी सहभाग घेत आपले नाव सुवर्णाक्षरांनी कोरले असल्याने सर्वत्र कौतुक होत आहे.
डायडाज दि इंटरनॅशनल डान्स स्कूलच्या या यशाबद्दल पालक, कला क्षेत्रातील मान्यवर व चिपळूणकरांकडून अभिनंदनाचा वर्षाव होत आहे.
डायडाज दि इंटरनॅशनल डान्स स्कूलच्या विद्यार्थ्यांची राष्ट्रीय पातळीवर चमकदार कामगिरी






