रत्नागिरी : डोळ्यांसमोर फक्त एकच ध्येय खाकी वर्दी! कधी कडक ऊन, कधी घामाच्या धारा अंगातून वाहत असतानाही त्या स्वप्नाकडे झेपावणारी पावले थांबत नाहीत. रत्नागिरी जिल्हा पोलीस दलात भरती होण्यासाठी जिल्ह्यातूनच नव्हे, तर परजिल्ह्यातून आलेला तरुणवर्ग रत्नागिरीच्या लाल मातीत आपली जिद्द आजमावत आहे.
रत्नागिरी जिल्हा पोलीस दलातील रिक्त पदांसाठी १३ फेब्रुवारी २०२६ पासून भरती प्रक्रियेला सुरुवात झाली आहे. शहरानजीकच्या एमआयडीसी मिरजोळे येथील जिल्हा क्रीडा संकुलात ही प्रक्रिया पार पडत असून, केवळ १७१ जागांसाठी हजारो उमेदवारांनी अर्ज केले आहेत. पहिल्याच दिवशी ८८४ उमेदवारांना शारीरिक चाचणीसाठी बोलावण्यात आले होते. त्यापैकी ६३७ उमेदवारांनी प्रत्यक्ष उपस्थिती नोंदवली, तर उर्वरित गैरहजर राहिले.
ही भरती प्रक्रिया अत्यंत शिस्तबद्ध, पारदर्शक आणि नियोजनबद्ध पद्धतीने राबवली जात असून २२ फेब्रुवारी २०२६ पर्यंत ती सुरू राहणार आहे. पहाटेपासूनच जिल्हा क्रीडा संकुल परिसरात उमेदवारांची गर्दी होत असून, मैदानात जिद्द, चिकाटी आणि क्षमतेचा कस लागलेला आहे.
ही संपूर्ण भरती प्रक्रिया रत्नागिरी जिल्ह्याचे पोलीस अधीक्षक नितीन बगाटे आणि अपर पोलीस अधीक्षक बी. बी. महामुनी यांच्या थेट मार्गदर्शनाखाली पार पडत आहे. कोणतीही त्रुटी राहू नये, यासाठी पोलीस अधिकारी व अंमलदार अहोरात्र मेहनत घेत आहेत.
बनावटगिरीला कठोर मज्जाव
भरती प्रक्रियेत केवळ गुणवत्तेलाच प्राधान्य दिले जाईल, असा स्पष्ट इशारा पोलीस प्रशासनाने दिला आहे. शारीरिक चाचणीदरम्यान कार्यक्षमता वाढवणारी औषधे, उत्तेजक द्रव्ये, स्पाईक शूज किंवा कोणतीही इलेक्ट्रॉनिक उपकरणे वापरण्यास सक्त मनाई करण्यात आली आहे. खोटी माहिती किंवा बनावट कागदपत्रे सादर केल्यास संबंधित उमेदवारावर तात्काळ कठोर कायदेशीर कारवाई केली जाणार असल्याचे स्पष्ट करण्यात आले आहे. अफवांना बळी न पडण्याचे आवाहनही प्रशासनाने केले आहे.
मदत व तक्रार निवारणाची सुविधा
भरती प्रक्रियेत कोणताही संशयास्पद प्रकार, फसवणूक किंवा अडचण आढळल्यास उमेदवारांनी तातडीने संपर्क साधावा, असे आवाहन करण्यात आले आहे. यासाठी पोलीस अधीक्षक कार्यालय, रत्नागिरी (०२३५२-२७१२५७), ‘रत्नसेतू’ चॅटबॉट (९३७१४१५६१२) तसेच लाचलुचपत प्रतिबंधक विभाग (०२३५२-२२२८९३ किंवा १०६४) या क्रमांकांवर संपर्क साधण्याची सुविधा उपलब्ध आहे.
ठरवून दिलेल्या वेळेत, सर्व आवश्यक मूळ कागदपत्रांसह उपस्थित राहून शिस्त व नियमांचे पालन करावे आणि पोलीस होण्याचे स्वप्न जिद्दीने साकार करावे, असे आवाहन रत्नागिरी जिल्हा पोलीस दलाच्या वतीने करण्यात आले आहे.
‘खाकी’च्या स्वप्नासाठी रणरणत्या उन्हात जिद्दीची परीक्षा; रत्नागिरीत पोलीस भरतीला उत्स्फूर्त प्रतिसाद






