चार दिवसांची पोलीस कोठडी
रत्नागिरी (प्रतिनिधी): मिरजोळे-नाखरेकरवाडी येथील भक्ती मयेकरच्या खून प्रकरणातील दोन संशयितांनी आणखी दोन खून केल्याचे उघडकीस आल्यानंतर, शहर पोलिसांनी या दोन्ही आरोपींना रविवारी (१४ सप्टेंबर) एका गुन्ह्यातून दुसऱ्या गुन्ह्यात वर्ग करत पुन्हा अटक केली. न्यायालयीन कोठडीत असलेल्या दुर्वास आणि विश्वास याला पोलिसांनी ताब्यात घेत पुन्हा न्यायालयात हजर केले असता न्यायालयाने त्यांना चार दिवसांची पोलीस कोठडी सुनावली.
दुर्वास दर्शन पाटील (वय २५, रा. जंगमवाडी, वाटद खंडाळा) आणि विश्वास विजय पवार (वय ४१, रा. कळझोंडी, रत्नागिरी) अशी अटक करण्यात आलेल्या संशयितांची नावे आहेत.
या गुन्हेगारांनी केवळ भक्ती मयेकरचाच नव्हे, तर इतर दोन व्यक्तींचाही खून केल्याचे प्राथमिक तपासात समोर आले होते.
तपासामध्ये, २९ एप्रिल २०२४ रोजी तालुक्यातील कळझोंडी येथील रहिवासी सिताराम लक्ष्मण वीर (वय ५५) यांना दुर्वास आणि विश्वास यांनी एका बारमध्ये जीव जाईपर्यंत मारहाण केली होती. मारहाणीनंतर त्यांना चक्कर आल्याचा बहाणा करून खंडाळा येथील प्राथमिक आरोग्य केंद्रात उपचारासाठी दाखल करण्यात आले. मात्र, उपचारादरम्यान त्यांचा मृत्यू झाला. या खुनाचे कारण समोर आले की, मृत सिताराम वीर हे दुर्वाससोबत प्रेमसंबंध असलेल्या भक्ती मयेकरसोबत फोनवर बोलत होते. याच कारणामुळे त्याचा ‘काटा’ काढण्यात आल्याचे उघड झाले.
सिताराम वीरच्या खुनाची माहिती त्यांच्याच साथीदार राकेश जंगम यांना होती. यामुळे राकेश यांच्याकडून या प्रकरणाची उकल होईल या भीतीने त्यालाही संपवण्याचा कट रचण्यात आला. कोल्हापूरला जायचे असल्याचे सांगून राकेश जंगमला घरातून बोलावून घेतले आणि कोल्हापूरला जात असताना गाडीत गळा आवळून त्याचा खून करून मृतदेह आंबा घाटात फेकून दिल्याची धक्कादायक बाब समोर आली आहे.
एक खून पचवल्यानंतर दुर्वास व त्याच्या साथीदारांनी एक वर्षाच्या आत आणखी दोन खून केले आणि त्यानंतर भक्ती मयेकरचा खून केला. भक्तीच्या खुनाची उकल झाल्यानंतरच मुख्य संशयित दुर्वासने इतर दोन खुनांची कबुली पोलिसांना दिली होती. त्यानंतर त्यांना न्यायालयीन कोठडीत पाठवण्यात आले होते. मात्र, या तिहेरी खून प्रकरणातील सिताराम वीर यांच्या खुनात सहभागी असलेल्या दुर्वास पाटील आणि विश्वास पवार यांना पोलिसांनी पुन्हा अटक केली आहे. न्यायालयाने त्यांना १७ सप्टेंबरपर्यंत पोलीस कोठडी सुनावली आहे. या प्रकरणाचा तपास पोलीस करत आहेत.
रत्नागिरी तिहेरी हत्याकांडातील दुर्वास पाटील आणि विश्वास पवारला पुन्हा अटक, न्यायालय कोठडीतून घेतले ताब्यात
