रत्नागिरी: रत्नागिरी शहरातील प्रसिद्ध भगवती किल्ल्याजवळील पाणभुयार स्पॉटजवळ आज दुपारी १२.३० वाजण्याच्या सुमारास एक २३ ते २५ वयोगटातील तरुणी खवळलेल्या समुद्रात कोसळून बेपत्ता झाल्याने मोठी खळबळ उडाली आहे. घटनास्थळी तरुणीची चप्पल आणि ओढणी आढळून आल्याने ही आत्महत्या आहे की सेल्फी काढताना तोल जाऊन घडलेला अपघात, याबद्दल तर्कवितर्क लढवले जात आहेत. विशेष म्हणजे, ही तरुणी बेपत्ता असल्याची कुठेही अधिकृत नोंद नसल्याने तिला शोधणे पोलिसांसाठी आव्हानात्मक बनले आहे.
आज रविवारची सुट्टी असल्याने भगवती किल्ल्याजवळील शिवसृष्टी पाहण्यासाठी स्थानिक आणि बाहेरून आलेल्या पर्यटकांनी मोठी गर्दी केली होती. त्यावेळी ही तरुणी रेलिंगच्या पुढे जाऊन सेल्फी काढण्यात मग्न असल्याचे समजते. सेल्फी काढताना तिने आपली चप्पल आणि स्कार्फ बाजूला काढून ठेवले होते. तिच्या आजूबाजूला इतर पर्यटक निसर्गाचा आनंद घेत असताना, काही क्षणात ती तरुणी अचानक सुमारे २०० ते २५० फूट खोल समुद्राच्या पाण्यात पडल्याचे निदर्शनास आले.
तरुणीला पाण्यात पडताना पाहून आजूबाजूच्या पर्यटकांनी आरडाओरडा सुरू केला, ज्यामुळे घटनास्थळी एकच गर्दी झाली. काही पर्यटकांनी तात्काळ शहर पोलिसांना माहिती दिली. पोलिसांनी घटनास्थळी धाव घेतली, परंतु तोपर्यंत ती तरुणी खवळलेल्या समुद्राच्या लाटांमध्ये दिसेनाशी झाली होती.
सायंकाळपर्यंत रत्नदुर्ग माऊंटेनियर्स आणि चिपळूणहून आलेले एनडीआरएफचे पथक फिशरीजच्या दोन ड्रोन कॅमेऱ्यांच्या सहाय्याने समुद्रात बेपत्ता झालेल्या या तरुणीचा शोध घेत होते. या घटनेमागील नेमके कारण शोधण्यासाठी पोलीस अधिक तपास करत आहेत. मात्र, तिने आत्महत्या केली की सेल्फी काढताना तोल जाऊन समुद्रात कोसळली, याचा अद्याप उलगडा झालेला नाही. तसेच, ही मुलगी कुठली आहे, याचाही थांगपत्ता लागलेला नाही. पोलीस या तरुणीचा शोध घेत असून, या घटनेने परिसरात चिंतेचे वातावरण निर्माण झाले आहे.