GRAMIN SEARCH BANNER

राजापुरातील वडवली येथे ५० मीटर रस्ता खचला; शाळकरी मुले, नागरिकांत भीती

दुर्घटना घडल्यास प्रशासन आणि संबंधित बांधकाम विभाग जबाबदार : मनसेचे संदीप पळसमकर यांचा इशारा

राजापूर :वडदहसोळ – ओणी मार्गावर वडवली आणि शिवणे बु. दरम्यान सुखद्याजवळील वहालाच्या पुलाजवळ जवळपास ५० मीटरचा रस्ता पूर्णपणे खचून पडला असून, त्या ठिकाणी मोठ्या प्रमाणावर भेगा पडलेल्या दिसत आहेत. इतकंच नव्हे तर रस्त्याच्या कडेला काँक्रीट टाकून उभारलेला गटारही तुटून खाली कोसळलेला आहे. सद्यस्थिती पाहता हा रस्ता केव्हाही वाहून जाण्याची दाट शक्यता असून, हजारो नागरिकांचे प्राण संकटात सापडले आहेत.

या ठिकाणी याआधीही रस्ता कोसळून वाहून गेला होता, त्यामुळे याची पुनरावृत्ती होण्याच्या स्पष्ट खुणा आता दिसत आहेत. तरीही प्रशासन आणि संबंधित बांधकाम विभाग यांची कोणतीही ठोस कारवाई किंवा उपस्थिती दिसून आलेली नाही.

पावसाचे प्रमाण वाढल्यास या रस्त्यावरून वाहणाऱ्या पाण्यामुळे संपूर्ण मार्गच खाली घसरून जाण्याची भीती नागरिक व्यक्त करत आहेत. अशा परिस्थितीत एखादी जीवघेणी दुर्घटना घडल्यास त्याची सर्वस्वी जबाबदारी तहसील कार्यालय, आपत्ती व्यवस्थापन विभाग आणि बांधकाम विभागावर राहील, असा थेट इशारा महाराष्ट्र सैनिक संघटनेचे श्री. संदीप विठ्ठल पळसमकर (मनसे, राजापूर) यांनी दिला आहे.

ते पुढे म्हणाले, “या गंभीर परिस्थितीची तातडीने दखल घेऊन प्रशासनाने सदर ठिकाणी पाहणी करून रस्त्याच्या खालच्या बाजूला संरक्षण भिंत उभारली नाही, तर आम्हाला जनआंदोलनाचा मार्ग अवलंबावा लागेल. लोकांचे प्राण रक्षण करणे हे तुमचे काम आहे, ते आम्हाला करायला भाग पाडू नका.”

या मार्गावरून दररोज शेकडो शाळकरी मुले, महिला, कामगार, रुग्णवाहिका व गावकरी प्रवास करत असतात. रस्ता कोसळल्यास संपूर्ण परिसर काही काळ वाहतुकीपासून पूर्णपणे तोडला जाईल. त्यामुळे प्रशासनाने आता तरी जागे होऊन तातडीची उपाययोजना करावी, अशी संतप्त मागणी संपूर्ण परिसरातून होऊ लागली आहे.

Total Visitor

0217831
Share This Article
Leave a Comment

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *