स्वराभिषेक, जयेश मंगल पार्कतर्फे आयोजन, गोव्याच्या सम्राज्ञी आईर – शेलार यांचे गायन
-स्वराभिषेकच्या शिष्यवर्गाचे सादरीकरण
रत्नागिरी : स्वराभिषेक संस्था आणि जयेश मंगल पार्कतर्फे 21 ऑक्टोबर रोजी शहरवासियांना दिवाळीनिमित्त सांगितिक फराळाची मेजवानी मिळणार आहे. यंदाच्या मैफलीचे वैशिष्ट्य म्हणजे गोव्यातील गायिका सम्राज्ञी आईर- शेलार यांच्या गायनाचा आस्वाद घेता येईल.
शहरातील थिबा पॅलेस रोडवरील जयेश मंगल पार्क येथे पहाटे 5.30 वाजता ही मैफल सुरू होणार आहे. भाजप पदवीधर सेल जिल्हा संयोजक मनोज पाटणकर, ज्येष्ठ विधीज्ञ ॲड. राजशेखर मलुष्टे, हार्मोनियम वादक चैतन्य पटवर्धन प्रमुख पाहुणे म्हणून उपस्थित राहणार आहेत.
या मैफलीत विनया विराज परब यांचा शिष्यवर्ग शास्त्रीय, भावगीत, अभंग, भक्तीगीत, नाट्यगीत,आणि चित्रपट गीते सादर करणार आहेत.
गोव्याच्या शेलार यांचे संगीताचे प्रारंभिक शिक्षण शास्त्रीय गायिका डॉ. शिल्पा डुबळे – परब यांच्याकडे झाले. त्यानंतर पं. सुधाकर करंदीकर, डॉ. हनुमंत बुरली, डॉ. शशांक मक्तेदार, पं. कमलाकर नाईक, राया कोरगावकर यांच्या मार्गदर्शनाखाली एम. ए. पदवी संपादन केली. त्यांनी सूरश्री केसरबाई केरकर संगीत संमेलन, मोगुबाई कुर्डीकर संगीत संमेलन, पं. जीतेंद्र अभिषेकी संगीत संमेलनासह अनेक नामवंत संमेलनामध्ये सादरीकरण केले आहे. त्यांना आकाशवाणी बी हाय श्रेणी प्राप्त असून गोवा सरकारचा युवा सृजन पुरस्कार मिळाला आहे. सध्या त्या गोवा कला अकादमीत संगीत शिक्षिका म्हणून कार्यरत आहेत.
संपूर्ण कार्यक्रमाचे संगीत संयोजन विनया विराज परब यांनी केले असून या मैफलीसाठी विनामूल्य प्रवेश ठेवण्यात आला आहे.
मैफलीला हार्मोनियम साथ महेश दामले, कीबोर्ड मंगेश मोरे, तबला केदार लिंगायत, पखवाज मंगेश चव्हाण , बासरी मंदार जोशी आणि तालवाद्य अव्दैत मोरे करणार असून ध्वनी संयोजन एस. कुमार साऊंड सर्व्हिसचे उदयराज सावंत हे करणार आहेत. शहरातील संगीतप्रेमींनी या मैफलीला मोठय़ा संख्येने उपस्थित राहून सांगितीक फराळाचा आस्वाद घ्यावा असे आवाहन स्वराभिषेक व जयेश मंगल पार्कतर्फे करण्यात आले आहे.