GRAMIN SEARCH BANNER

लांजा शहरात मुंबई-गोवा महामार्गावर मध्यरात्री भीषण अपघात; मोकाट गुरांमुळे कार पलटी, दोन जनावरे दगावली

Gramin Varta
446 Views

लांजा : मुंबई-गोवा महामार्गावर लांजा शहराच्या हद्दीत, कुकुटपालन कुंभारवाडीजवळ मोकाट गुरांच्या बेधडक वावरामुळे शुक्रवारी मध्यरात्री २.२० वाजता भीषण अपघात झाला. गोव्याच्या दिशेने भरधाव वेगाने जाणारी एक चारचाकी गाडी रस्त्याच्या मध्यभागी बसलेल्या गुरांना धडकून त्याच ठिकाणी पलटी झाली. सुदैवाने गाडीतील चौघे प्रवासी पूर्णपणे सुखरूप बचावले असले तरी वाहनाचे मोठे नुकसान झाले असून, धडकेत एका गायीसह एका पाड्याचा जागीच मृत्यू झाला आहे. मोकाट गुरांमुळे होणाऱ्या या वाढत्या अपघातांवर आता नगरपंचायत प्रशासनाने गांभीर्याने लक्ष देण्याची मागणी होत आहे.

अपघाताची माहिती मिळताच लांजा नगरपंचायत आणि पोलिस प्रशासनाने तातडीने घटनास्थळी धाव घेतली. लांजा पोलीस स्थानकाचे पोलीस निरीक्षक नीळकंठ बगळे यांच्यासह पोलीस प्रशासन आणि नगरपंचायतीचे कर्मचारी यांनी कुंभारवाडीतील तरुणांच्या मदतीने अपघातग्रस्त वाहन बाजूला करून वाहतूक सुरळीत करण्यासाठी सहकार्य केले. यावेळी असीम पाटणकर, पंढरीनाथ मायशेट्ये, हेमंत कुंभार, आरिफ चिकली, रोशन कुंभार, दुर्गेश मायशेट्ये, अमित समगीस्कर, यश शिंदे, ज्ञानेश्वर मायशेट्ये, दानिश पालकर, शकील खान, अमर कुंभार, हासन दसुरकर, सिराज दसुरकर या स्थानिक तरुणांनी मदतीसाठी मोलाची भूमिका बजावली.

लांजा शहरात मोकाट जनावरांचा रस्त्यावर मोठ्या प्रमाणात वावर असतो. मध्यरात्री महामार्गावर ही जनावरे बसलेली असल्याने अशा प्रकारचे जीवघेणे अपघात वारंवार घडत आहेत. या पार्श्वभूमीवर, शहरातील नागरिक श्री. अरबाज जी. नेवरेकर हे नगरपंचायत प्रशासनाकडे मोकाट गुरांच्या समस्येवर त्वरित उपाययोजना करावी यासाठी निवेदन देणार आहेत. शहराच्या मध्यभागी असलेल्या राष्ट्रीय महामार्गावर वारंवार होणाऱ्या या अपघातांमुळे नागरिक आणि प्रवाशांच्या सुरक्षिततेचा प्रश्न पुन्हा एकदा ऐरणीवर आला आहे. प्रशासनाने त्वरित या समस्येवर कायमस्वरूपी तोडगा काढण्याची आवश्यकता व्यक्त होत आहे.

Total Visitor Counter

2665962
Share This Article