चिपळूण : येथील सह्याद्री निसर्ग मित्र व नाटक कंपनीच्या सहयोगाने आयोजित केलेल्या आगळ्यावेगळ्या होम मिनिस्टर स्पर्धेत ३०१ महिलांनी १७३० किलो प्लास्टिक संकलन केले.
चिपळूण नगरपालिकेने स्वच्छतेबरोबरच प्लास्टिकमुक्त चिपळूण ही मोहीम मोठ्या जोमानं सुरू केली आहे. या पार्श्वभूमीवर चिपळूणमधील महिलांसाठी खास चिपळूण होम मिनिस्टर ही आगळीवेगळी स्पर्धा आयोजित करण्यात आली होती. स्पर्धेला शहरातील महिलांनी उत्स्फूर्त प्रतिसाद देत ३०१ महिलांनी सहभाग घेतला. १५ जुलै ते १५ ऑगस्ट २०२५ या एका महिन्याच्या कालावधीत महिलांनी मिळून १,७३० किलो प्लास्टिक जमा केले. जमा झालेल्या प्लास्टिकच्या प्रत्येक पाव किलोला एक कुपन देण्यात आले. या माध्यमातून एकूण ६,९२१ कुपन्सचे वाटप झाले, तर १५ हून अधिक कुपन्स मिळवणाऱ्या महिलांची संख्या १८८ झाली.
चिपळूण पालिकेचे मुख्याधिकारी विशाल भोसले यांच्या संकल्पनेतून ही अनोखी स्पर्धा राबवण्यात आली. शहरात सुरू असलेल्या स्वच्छता मोहिमेसाठी अभिनेता ओंकार भोजने यांची स्वच्छता दूत म्हणून नियुक्ती करण्यात आली आहे. प्लास्टिक मुक्तीच्या दिशेने ही मोहीम यशस्वी होत असल्याचे समाधान मुख्याधिकारी भोसले यांनी व्यक्त केले.
स्पर्धेत सहभागी महिलांना जमा झालेल्या कूपन्सद्वारे पैठणी देण्यात येणार असून, होम मिनिस्टर या खेळातून विजेत्या महिलेला सोन्याची नथ देऊन सन्मानित करण्यात येणार आहे. बक्षीस वितरण आणि होम मिनिस्टर खेळ येत्या बुधवारी, दि. २० ऑगस्ट रोजी चिपळूण शहरातील इंदिरा गांधी सांस्कृतिक केंद्रात रंगणार आहे. या कार्यक्रमाला पालकमंत्री उदय सामंत, आमदार शेखर निकम यांच्यासह विशेष अतिथी म्हणून अभिनेत्री वनिता खरात आणि अभिनेता ओंकार भोजने उपस्थित राहणार आहेत.
स्पर्धेत सहभागी झालेल्या सर्व महिलांनी तसेच इतरांनी मोठ्या संख्येने उपस्थित राहावे, असे आवाहन मुख्याधिकारी विशाल भोसले, सह्याद्री निसर्ग मित्रचे संचालक भाऊ काटदरे आणि चिपळूण नाटक कंपनीचे अध्यक्ष मानस संसारे यांनी केले आहे.
चिपळूणच्या होम मिनिस्टर स्पर्धेत ३०१ महिलांकडून १७३० किलो प्लास्टिकचे संकलन
