GRAMIN SEARCH BANNER

स्वच्छतेसाठी चिपळूण एकवटले: ओंकार भोजने यांच्या उपस्थितीत प्लास्टिकमुक्ती मोहिमेला उत्स्फूर्त प्रतिसाद

चिपळूण: “मी चिपळूणकरांना संदेश देण्यासाठी नाही, तर शहर स्वच्छ करण्यासाठी आलो आहे,” अशा शब्दांत अभिनेता आणि चिपळूण नगर परिषदेचे स्वच्छता दूत ओंकार भोजने यांनी प्लास्टिकमुक्त चिपळूण मोहिमेची प्रेरणादायी सुरुवात केली. प्रांत कार्यालय, चिपळूण नगर परिषद आणि प्रशासन यांच्या संयुक्त विद्यमाने आयोजित या उपक्रमास शहरवासीयांचा अभूतपूर्व प्रतिसाद लाभला.

प्रांताधिकारी आकाश लिगाडे व नगर परिषदेचे मुख्याधिकारी विशाल भोसले यांच्या नेतृत्वाखाली शहरातील ११ ठिकाणी एकाच वेळी स्वच्छता मोहीम राबवण्यात आली. अकरा टीमद्वारे ही मोहीम यशस्वीपणे पार पडली. तीन हजारांहून अधिक विद्यार्थी, विविध सामाजिक संस्था, शाळा, महाविद्यालये, व्यापारी, राजकीय व प्रशासकीय प्रतिनिधी आणि नागरिकांनी या अभियानात सक्रीय सहभाग नोंदवला.

उद्घाटनानंतर अभिनेता ओंकार भोजने यांनी घंटागाडीतून शहरात फेरी मारून नागरिकांमध्ये जनजागृती केली. त्यांनी व्यापाऱ्यांना प्लास्टिकमुक्तीविषयी पत्रके वाटली. यावेळी नगरसेवक, अधिकारी आणि कर्मचारीही त्यांच्या सोबत सहभागी झाले. अनेक ठिकाणी ‘नो प्लास्टिक झोन’ ची निर्मिती करण्यात आली.

“मी केवळ ब्रँड अँबेसिडर नाही, तर या चळवळीचा कार्यकर्ता आहे. चिपळूणमधील प्रत्येक जबाबदार नागरिकच या मोहिमेचा खरा ब्रँड अँबेसिडर आहे,” असे भावनिक उद्गार त्यांनी काढले. त्यांनी तरुणांना स्वच्छतेच्या अभियानात पुढाकार घेण्याचे आवाहन केले.
इंदिरा गांधी सांस्कृतिक केंद्रात झालेल्या समारोप कार्यक्रमात आमदार शेखर निकम यांनी सहभाग घेतला. “विद्यार्थ्यांचा सहभाग महत्त्वाचा आहे. स्वच्छतेबाबत स्पर्धा आणि उपक्रम आयोजित करून जनजागृती वाढवू,” अशी ग्वाही त्यांनी दिली. प्रांताधिकारी आणि मुख्याधिकाऱ्यांच्या कार्यशैलीचे त्यांनी कौतुक केले.

या कार्यक्रमात ओंकार भोजने यांना अधिकृतपणे स्वच्छता अभियानाचा ब्रँड अँबेसिडर म्हणून नियुक्त करण्यात आले. “हा सन्मान नाही, तर जबाबदारी आहे,” असे म्हणत त्यांनी चिपळूणमध्ये सातत्याने उपक्रम राबवण्याची ग्वाही दिली. गांधाधारेश्वर तिठा येथे वृक्षारोपण तर कळंबस्ते येथे प्रांताधिकारी आकाश लिगाडे यांच्या संकल्पनेतील ‘देवराई’ला भेट देण्यात आली.
या उपक्रमात भाऊ काटदरे, आशिष खातू, रामशेठ रेडीज, सीमा चाळके, मनोज शिंदे, रसिका देवळेकर, मिलिंद कापडी, शहानवाज शहा यांच्यासह अनेक आजी-माजी नगरसेवक सहभागी झाले. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन सुजित जाधव यांनी केले.

Total Visitor Counter

2474941
Share This Article