मुंबई : मध्य आणि कोकण रेल्वे मार्गावर सुरू असलेल्या सीएसएमटी-मडगाव वंदे भारत एक्स्प्रेसच्या शेकडो फेऱ्या रद्द होणार आहेत. कोकण रेल्वे मार्गावरील पावसाळी वेळापत्रकामुळे मुंबई-गोवा वंदे भारत एक्स्प्रेसच्या अप आणि डाऊन फेऱ्या कमी करण्यात येणार आहेत.
रेल्वे प्रवाशांच्या सुरक्षेसाठी कोकण रेल्वे मार्गावर १५ जून ते २० ऑक्टोबर या कालावधीत पावसाळी वेळापत्रक लागू करण्यात आले आहे. त्यामुळे या कालावधीत रेल्वेगाड्यांचा वेग मंदावतो. बहुतांश रेल्वेगाड्यांच्या वेळापत्रकात बदल होतो. याचा सर्वाधिक फटका अतिजलद रेल्वेगाड्यांना बसतो. त्यात वंदे भारत एक्स्प्रेसला फटका बसला आहे. आठवड्यातून सहा वेळा धावणारी वंदे भारत आता पावसाळी वेळापत्रकानुसार फक्त तीन दिवस धावेल.
कोकणात जाणाऱ्यांची संख्या गणेशोत्सव काळात सर्वाधिक असते. तसेच पावसाळ्यात मुंबई ते गोवा दरम्यानचे निसर्गसौंदर्य पाहण्यासाठी पर्यटक वंदे भारतचा प्रवास निवडतात. मात्र, जून ते ऑक्टोबर या कालावधीत मुंबई ते गोवा वंदे भारतच्या शंभरहून अधिक फेऱ्या रद्द होतील.
गाड्यांचा वेग कमी का होणार?
धो-धो पाऊस पडत असताना, दृश्यमानता कमी होते. त्यामुळे रेल्वे मार्ग पटकन दृष्टीस पडत नाही. तसेच आपत्कालीन परिस्थिती असल्यास लक्षात येत नाही. सुरक्षितता राखण्यासाठी जोरदार पाऊस पडतो तेव्हा रेल्वेचा वेग ताशी ४० किमी ठेवण्यात यावा, अशा सूचना लोको पायलट यांना देण्यात आल्या आहेत.
पावसाळी वेळापत्रकानुसार मुंबई ते गोवा सुमारे ५८६ किमी अंतर कापण्यासाठी वंदे भारत एक्स्प्रेसला ८ ते १० तास लागतात. गाडी क्रमांक २२२२९ सीएसएमटी-मडगाव वंदे भारत एक्स्प्रेस दर सोमवार, बुधवार आणि शुक्रवारी पहाटे ५.२५ वाजता सीएसएमटीवरून सुटते आणि मडगाव येथे दुपारी ३.३० वाजता पोहचते. गाडी क्रमांक २२२३० मडगाववरून दर मंगळवार, गुरुवार आणि शनिवारी दुपारी १२.२० वाजता सुटते आणि रात्री १०.२५ वाजता सीएसएमटी मुंबईला पोहचते.
कोकण रेल्वे मार्गावरील मुंबई-गोवा वंदे भारतच्या शेकडो फेऱ्या रद्द

Leave a Comment