GRAMIN SEARCH BANNER

धामणी येथील काजू फॅक्टरीला भीषण आग; लाखोंचे नुकसान

Gramin Varta
27 Views

संगमेश्वर: मुंबई-गोवा राष्ट्रीय महामार्गावरील धामणी येथे शनिवारी सकाळी एका काजू प्रक्रिया उद्योगाला भीषण आग लागून सुमारे ६० लाख रुपयांचे नुकसान झाल्याचा प्राथमिक अंदाज वर्तवण्यात आला आहे. शॉर्ट सर्किटमुळे ही आग लागल्याचा संशय व्यक्त करण्यात येत आहे.

धामणी येथील चंद्रकांत गणू बांबाडे यांच्या “निसर्ग कोकण मेवा” या काजू फॅक्टरीमध्ये सकाळी ७.३० च्या सुमारास ही घटना घडली. नेहमीप्रमाणे फॅक्टरी सुरू करण्याच्या वेळी ग्रामस्थांना आगीच्या ज्वाळा दिसल्या. त्यांनी तातडीने बांबाडे यांना याची माहिती दिली. आगीचे कारण अद्याप स्पष्ट झाले नसले तरी शॉर्ट सर्किटमुळे ही आग लागल्याचा प्राथमिक अंदाज व्यक्त करण्यात येत आहे.

आगीमुळे फॅक्टरीतील काजू सोलण्याची महागडी यंत्रसामग्री, तीन हजार किलो काजू गर आणि १० टन कच्च्या काजू बिया तसेच इतर साहित्य जळून खाक झाले आहे. आगीच्या या घटनेत मोठे आर्थिक नुकसान झाले असून, सुमारे ६० लाख रुपयांचे नुकसान झाल्याचा अंदाज वर्तवण्यात येत आहे.

देवरुख नगरपंचायतीचा अग्निशमन बंब घटनास्थळी पोहोचण्यापूर्वीच स्थानिक ग्रामस्थांनी आग विझवण्यासाठी शर्थीचे प्रयत्न केले. अथक प्रयत्नांनंतर सकाळी १० वाजण्याच्या सुमारास आगीवर नियंत्रण मिळवण्यात यश आले. या घटनेची माहिती मिळताच आमदार शेखर निकम आणि माजी जिल्हा परिषद उपाध्यक्ष संतोष थेराडे यांनी घटनास्थळी भेट देऊन पाहणी केली आणि बाधितांना तात्काळ मदतीचे आश्वासन दिले.

या घटनेनंतर पोलीस पाटील अप्पा पाध्ये, पोलीस संदेश जाधव आणि लोखंडे यांच्यासह ग्राम महसूल अधिकारी विलास घोलप आणि संदेश घाग यांनी घटनास्थळी पोहोचून पंचनामा केला. आगीच्या नेमक्या कारणाचा तपास पोलीस करत आहेत. या घटनेमुळे बांबाडे यांच्या कुटुंबावर मोठे संकट आले आहे.

Total Visitor Counter

3366895
Share This Article