सावर्डे: गोविंदराव निकम माध्यमिक आणि उच्च माध्यमिक विद्यालय, सावर्डे येथे स्पर्धा परीक्षा विद्यार्थी समूहाअंतर्गत नुकताच “यशस्वी विद्यार्थ्यांची मुलाखत” हा अत्यंत प्रेरणादायी कार्यक्रम उत्साहात पार पडला. विद्यार्थ्यांमध्ये स्पर्धा परीक्षांविषयी उत्साह निर्माण व्हावा, तसेच यशस्वी विद्यार्थ्यांच्या प्रत्यक्ष अनुभवातून त्यांना योग्य मार्गदर्शन मिळावे, या उद्देशाने या विशेष कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते.
या कार्यक्रमात राष्ट्रीय आर्थिक दृष्ट्या मागास शिष्यवृत्ती परीक्षा (N.M.M.S.) आणि माध्यमिक शिष्यवृत्ती परीक्षेत नेत्रदीपक यश मिळवलेल्या गुणवंत विद्यार्थ्यांची मुलाखत घेण्यात आली. यामध्ये माध्यमिक शिष्यवृत्तीधारक आदिती शेंडगे, विपुल सुर्वे तसेच N.M.M.S. शिष्यवृत्तीधारक श्रेया राडे, श्रावणी राठोड, सर्वेश तांदळे आणि आर्या पवार यांचा सहभाग होता. या सर्व यशस्वी विद्यार्थ्यांची मुलाखत दीप्ती लिबे हिने अत्यंत प्रभावीपणे घेतली.
मुलाखतीदरम्यान या विद्यार्थ्यांनी आपले अनुभव मनमोकळेपणे कथन केले. यश मिळवण्यासाठी वेळेचे योग्य नियोजन, अवघड विषयांवर अधिक लक्ष केंद्रित करणे, प्रश्नपत्रिकांचा नियमित सराव करणे आणि शिक्षकांकडून वेळोवेळी शंकांचे निरसन करून घेणे किती महत्त्वाचे आहे, हे त्यांनी आवर्जून सांगितले. सर्वात महत्त्वाचे म्हणजे, ‘सातत्यपूर्ण अभ्यास हीच यशाची खरी गुरुकिल्ली आहे,’ यावर त्यांनी विशेष भर दिला. त्यांच्या या अनुभवांनी उपस्थित इतर विद्यार्थ्यांना नवी दिशा आणि प्रेरणा मिळाली.
या महत्त्वपूर्ण उपक्रमाच्या यशस्वीतेसाठी सहाय्यक शिक्षक मनोज कुलकर्णी, अविनाश पोतदार, संचिता कदम, श्रेया राजेशिर्के आणि अमित साळवी यांनी विशेष मेहनत घेतली. विद्यार्थ्यांनी स्वयंप्रेरणेने हा उपक्रम राबवून इतरांसाठी प्रेरणा निर्माण केल्याबद्दल विद्यालयाचे प्राचार्य राजेंद्र वारे व उप प्राचार्य विजय चव्हाण यांनी मार्गदर्शक शिक्षक आणि यशस्वी विद्यार्थ्यांचे मन:पूर्वक अभिनंदन करून त्यांच्या यशाबद्दल गौरवोद्गार काढले. या कार्यक्रमामुळे विद्यार्थ्यांना मोठी प्रेरणा आणि स्पर्धा परीक्षांसाठी योग्य दिशा मिळाल्याचे मत शिक्षक आणि विद्यार्थ्यांनी व्यक्त केले.