हरपुडे,आंगवली येथील नागरिकांनी मांडल्या ‘जल जीवन मिशन’च्या अपूर्ण कामाबाबत समस्या
देवरुख: गाव विकास समितीच्या वतीने ॲड.सुनील खंडागळे यांनी आयोजित केलेल्या जनता दरबाराला गोताडवाडी, आंगवली आणि हरपुडे येथील नागरिकांनी उत्स्फूर्त प्रतिसाद देत आपल्या समस्या मांडल्या. या जनता दरबारात जवळपास शंभरहून अधिक नागरिकांनी सहभाग घेतला, ज्यात महिलांची संख्या लक्षणीय होती.
नागरिकांनी आपल्या वैयक्तिक समस्या मांडताना आंगवली आणि हरपुडे येथे पार पडलेल्या जनता दरबारात नागरिकांनी प्रामुख्याने जल जीवन मिशन योजनेच्या अर्धवट कामांबद्दल आपले गाऱ्हाणे मांडले. ही योजना अपूर्ण असल्याने नागरिकांना पाण्यासाठी मोठा मनस्ताप सहन करावा लागत असल्याबद्दल यावेळी चर्चा झाली. आंगवली व हरपुडे गावात जलजीवन योजनेत घोळ असल्याची तक्रार नागरिकांनी केली आणि तसे निवेदनही गाव विकास समितीला दिले.
नागरिकांची मागणी लक्षात घेऊन, आंगवली आणि हरपुडे येथील जल जीवन मिशनचा विषय गाव विकास समितीच्या माध्यमातून प्राधान्याने हाताळला जाईल, अशी माहिती एडवोकेट सुनील खंडागळे यांनी यावेळी दिली.
या जनता दरबारात महिला व अन्य नागरिकांनी मांडलेल्या सर्व समस्या प्राधान्याने सोडवण्याचा प्रामाणिक प्रयत्न गाव विकास समितीच्या माध्यमातून केला जाईल, अशी ग्वाही एडवोकेट सुनील खंडागळे यांनी दिली. ज्या नागरिकांना कोणत्याही प्रकारच्या समस्या असतील, त्यांनी गाव विकास समिती संघटनेशी संपर्क साधावा, असे आवाहनही त्यांनी केले. ज्या नागरिकांनी समस्या मांडल्या आहेत, त्यांच्या समस्या लवकरात लवकर सोडवण्यासाठी प्रयत्न करण्यात येतील, असेही सुनील खंडागळे यांनी स्पष्ट केले.
गाव विकास समितीच्या पुढाकाराने ग्रामीण भागातील समस्यांना वाचा फोडण्याच्या प्रयत्नांना नागरिकांनी सक्रिय पाठिंबा दर्शवला आहे.