सावर्डे: कौशल्याधिष्ठित शिक्षण घेऊन देशाच्या विकासात सक्रिय योगदान देण्याचे आवाहन करत, सह्याद्री शिक्षण संस्थेच्या आय.टी.आय. सावर्डे येथे शुक्रवार, दिनांक 04 ऑक्टोबर 2025 रोजी अखिल भारतीय व्यवसाय परीक्षा जुलै 2025 मध्ये उत्तीर्ण झालेल्या प्रशिक्षणार्थ्यांचा ‘कौशल्य दीक्षांत समारंभ’ मोठ्या उत्साहात पार पडला.
कार्यक्रमाची सुरुवात संस्थेचे संस्थापक स्व. गोविंदराव निकम साहेबांच्या प्रतिमेस अभिवादन आणि दीपप्रज्वलन करून करण्यात आली. या सोहळ्यासाठी सह्याद्री तंत्रनिकेतनचे प्राचार्य मा. श्री. मंगेश भोसले हे प्रमुख मार्गदर्शक म्हणून लाभले, तर मा. श्री. चंद्रकांत भाऊराव सुर्वे (चेअरमन, व्यवस्थापक कमिटी, आयटीआय), फार्मसी कॉलेजचे प्राचार्य मा. श्री. प्रवीण वाघचौरे आणि सह्याद्री स्कूल ऑफ आर्ट्सचे प्राचार्य मा. श्री. माणिक यादव यांसारखे मान्यवर उपस्थित होते.
आयटीआयचे प्राचार्य मा. श्री. उमेश लकेश्री यांच्या हस्ते सर्व मान्यवरांचे शाल, श्रीफळ व पुष्पगुच्छ देऊन स्वागत करण्यात आले. प्राचार्य लकेश्री यांनी आपल्या प्रास्ताविक भाषणात नव्याने प्रवेश घेतलेल्या प्रशिक्षणार्थ्यांना आवाहन केले की, त्यांनीही कठोर परिश्रमाने पुढील परीक्षेत अव्वल गुण मिळवावेत आणि त्यांचा गौरव खुद्द पंतप्रधान श्री. नरेंद्रजी मोदी यांच्या हस्ते व्हावा, अशी इच्छा व्यक्त केली.
यानंतर संस्थेच्या विविध ट्रेडमधून प्रथम तीन क्रमांकाने उत्तीर्ण झालेल्या सर्व गुणवंत प्रशिक्षणार्थ्यांचा गौरव चिन्ह, गुलाबपुष्प आणि उत्तीर्ण प्रमाणपत्र देऊन मान्यवरांच्या हस्ते सत्कार करण्यात आला.
प्रमुख मार्गदर्शक मा. श्री. मंगेश भोसले यांनी आपल्या मार्गदर्शनपर भाषणात, आयटीआयच्या या घवघवीत यशाचे श्रेय सह्याद्री शिक्षण संस्था, कॉलेजचे प्राचार्य आणि शिक्षकांना दिले. त्यांनी स्पष्ट केले की, पंतप्रधान मोदीजींना अभिप्रेत असलेला ‘आत्मनिर्भर भारत’ फक्त आयटीआयचे प्रशिक्षणार्थीच साकार करू शकतात, कारण त्यांच्या हातामध्ये रोजगारक्षम कौशल्ये आहेत. जर्मनीचे उदाहरण देत त्यांनी सांगितले की, तेथील 50% विद्यार्थी आयटीआयचे प्रशिक्षण घेतात, त्यामुळेच तो देश उद्योगधंद्यात जगात आघाडीवर आहे.
तसेच, यशस्वी उद्योजक होण्यासाठी सॉफ्ट स्किल्स चे महत्त्व विशद करताना त्यांनी महान उद्योजक मा. श्री. किर्लोस्कर यांचे उदाहरण दिले. त्यांच्या टीमवर्कमुळेच किर्लोस्कर पंप्स आज 150 देशांमध्ये विकले जातात. यासोबतच, त्यांनी प्रशिक्षणार्थ्यांना वेळेचे व्यवस्थापन कसे करावे, याचे सखोल मार्गदर्शन केले.
दरम्यान, कार्यक्रमादरम्यान ठीक 11.00 वाजता विज्ञान भवन, नवी दिल्ली येथे देशाचे माननीय पंतप्रधान श्री. नरेंद्रजी मोदी यांच्या उपस्थितीत आयोजित करण्यात आलेल्या देशपातळीवरील ‘कौशल्य दीक्षांत समारंभा’चे थेट प्रक्षेपण सर्व उपस्थितांना दाखवण्यात आले. यावेळी पंतप्रधानांच्या हस्ते देशभरातील आयटीआयमधील अव्वल विद्यार्थ्यांचा गौरव करण्यात आला.
उपस्थित सर्व मान्यवर, सर्व निदेशक वर्ग, आजी-माजी विद्यार्थी आणि त्यांच्या पालकांचे आभार मानून राष्ट्रगीताने या महत्त्वपूर्ण कार्यक्रमाची सांगता करण्यात आली. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन श्री. सुभाष महादेव गोरिवले यांनी केले.