GRAMIN SEARCH BANNER

ब्रेकिंग : चिपळुणात गोळीबाराने खळबळ: खिडकीतून घरात शिरली शिकारीची गोळी

चिपळूण: शहरातील गोवळकोट रोड परिसरातील हायलाईफ बिल्डिंगमध्ये एक धक्कादायक घटना घडली आहे. पहिल्या मजल्यावर राहणाऱ्या अशरफ तांबे यांच्या किचनमध्ये अचानक एक बंदुकीची  गोळी खिडकीची काच फोडून आत शिरली. सकाळी ११ वाजण्याच्या सुमारास घडलेल्या या घटनेमुळे परिसरातील नागरिकांमध्ये कमालीची घबराट पसरली आहे.

मिळालेल्या माहितीनुसार, तांबे यांच्या फ्लॅटमधील किचनच्या खिडकीला गोळीमुळे छिद्र पडले होते आणि छऱ्याची गोळी खाली पडलेली दिसली. या घटनेची माहिती तात्काळ चिपळूण पोलीस ठाण्यात देण्यात आली. घटनेची माहिती मिळताच पोलीस निरीक्षक फुलचंद मेंगडे यांनी तातडीने घटनास्थळी धाव घेतली आणि परिस्थितीची पाहणी केली.

अशरफ तांबे यांच्या घराशेजारील शेतातून शिकारीच्या उद्देशाने ही गोळी झाडण्यात आली असावी, असा पोलिसांचा प्राथमिक अंदाज आहे. विशेष म्हणजे, दिवसाढवळ्या नागरी वस्तीमध्ये अशा प्रकारे गोळीबार झाल्याने नागरिकांच्या सुरक्षिततेचा प्रश्न पुन्हा एकदा ऐरणीवर आला आहे.

तक्रारदार साजिद सरगुरो यांनी माहिती देताना सांगितले की, “मला सकाळी पावणे अकराच्या सुमारास फोन आला की, आमच्या खिडकीतून गोळी आत आली आहे आणि काच फुटली आहे. कोणीतरी इथे शिकार करत असावे असा आमचा अंदाज आहे. आम्ही आवाज दिल्यावर ते पळून गेले.” ते पुढे म्हणाले, “आमच्या बिल्डिंगच्या पाठीमागे शेती आहे, जिथे सध्या भात लावणीचे काम सुरू आहे. याच भागातून ही छऱ्याची गोळी आली असावी. ही गोळी जर काचेला लागली नसती आणि थेट घरात व्यक्तीला लागली असती, तर मोठा अनर्थ घडला असता.”

या घटनेमुळे परिसरात भीतीचे सावट पसरले असून, चिपळूण पोलीस या प्रकरणाचा सखोल तपास करत आहेत.

Total Visitor Counter

2475011
Share This Article