रत्नागिरी: प्रेमसंबंधातून झालेल्या भक्ती मयेकरच्या खून प्रकरणातील तपास आता एका निर्णायक वळणावर पोहोचला आहे. रत्नागिरीतील सायली देशी बारमधून पोलिसांना भक्ती मयेकरचा मोबाईल हस्तगत करण्यात यश आलं आहे. या मोबाईलमुळे या गुन्ह्याशी संबंधित अनेक महत्त्वाचे धागेदोरे पोलिसांच्या हाती लागण्याची शक्यता आहे, ज्यामुळे अनेक गुंतागुंतीच्या रहस्यांचा उलगडा होण्याची चिन्हे आहेत. काही दिवसांपूर्वी वाटद-खंडाळा येथे भक्ती मयेकर (२६, रा. मिरजोळे नाखरेकरवाडी) हिचा वायरने गळा आवळून खून करण्यात आला होता. या प्रकरणाच्या तपासादरम्यान, सायली देशी बारचा मालक दुर्वास पाटील याचे तिच्याशी प्रेमसंबंध असल्याचे उघड झाले. भक्ती लग्नासाठी तगादा लावत असल्याने दुर्वासने विश्वास पवार आणि सुशांत नरळकर यांच्या मदतीने तिचा १६ ऑगस्ट रोजी आपल्या बारमध्ये खून केला. त्यानंतर तिचा मृतदेह आंबा घाटात फेकून देण्यात आला. याच बारमध्ये यापूर्वी २९ एप्रिल २०२४ रोजी आणखी एक धक्कादायक घटना घडली होती. दुर्वास पाटीलने सिताराम लक्ष्मण किर (वय ५५, रा. कळझोंडी) याला फोनवर अश्लील भाषेत बोलण्याच्या कारणावरून विश्वास पवारच्या मदतीने बेदम मारहाण केली होती, ज्यात त्याचा मृत्यू झाला.
विशेष म्हणजे, राकेश जंगम हा सितारामच्या खुनाची माहिती पोलिसांना देईल या भीतीने दुर्वासने त्याचाही खून केला होता. या दोन्ही खुनांचे केंद्रस्थान असलेल्या सायली देशी बारला राज्य उत्पादन शुल्क विभागाने गुरुवारी सील केलं आहे. याच वेळी पोलिसांनी बारच्या परिसराची कसून तपासणी केली आणि भक्तीचा मोबाईल हस्तगत करण्यात यश मिळवलं. पोलिसांना मिळालेला भक्ती मयेकरचा मोबाईल आता या प्रकरणातील तपासाची दिशा बदलू शकतो. पोलीस आता तिच्या मोबाईलमधील कॉल डिटेल्स रेकॉर्ड (CDR) आणि चॅटिंगची तपासणी करणार आहेत. दुर्वाससोबत झालेले तिचे संभाषण आणि चॅटिंगचे पुरावे, तसेच सिताराम वीरसोबत झालेल्या अश्लील संभाषणाचे पुरावे पोलिसांच्या हाती लागण्याची दाट शक्यता आहे. या तांत्रिक तपासातून या गुन्ह्यातील प्रत्येक घटनाक्रम अधिक स्पष्ट होईल आणि संशयितांविरोधात एक सबळ पुरावा मिळण्यास मदत होईल. या मोबाईलच्या तपासणीमुळे या गुन्ह्यांशी संबंधित अनेक अज्ञात गोष्टी बाहेर येण्याची शक्यता निर्माण झाली आहे.






