महावितरणच्या मान्सूनपूर्व देखभाल, दुरूस्तीचे पूर्वनियोजित कामे आता सकाळच्या सत्रात होणार

saurabhsalvi26@gmail.com
2 Min Read

मुंबई: उन्हाळ्यात विजेच्या वाढत्या मागणीच्या कालावधीत आणि पावसाळी परिस्थितीत वीजपुरवठा सुरळीत ठेवण्यासाठी महावितरणकडून वीज यंत्रणेशी संबंधित विविध देखभाल व दुरुस्तीचे पूर्वनियोजित कामे सध्या वेगात सुरु आहे. मात्र उन्हाचा तडाख्यात नागरिकांची गैरसोय टाळण्यासाठी देखभाल व दुरुस्तीचे पूर्वनियोजित कामे संबंधित दिवशी सकाळी ७ ते ११ वाजेदरम्यान करावेत असे निर्देश मुख्यालयाकडून क्षेत्रीय कार्यालयांना शनिवारी (दि. २५) देण्यात आले.

महावितरणची प्रामुख्याने पावसाळ्यात वीजयंत्रणा सज्ज ठेवण्यासाठी तसेच वीजपुरवठा खंडित होणे व वीजसुरक्षेचे धोके टाळण्यासाठी वीज ग्राहकांना पूर्वसूचना देऊन देखभाल व दुरूस्तीचे कामे वीजराज्यभरात सध्या सुरु आहे. साधारणतः मे महिन्याच्या अखेरीस सर्व कामे पूर्णत्वास जातात. मात्र सद्यस्थितीत सकाळी १० ते दुपारी २ किंवा चार वाजेपर्यंत वीज पुरवठा बंद ठेवत देखभाल व दुरुस्तीचे कामे सुरु आहेत. नागरिकांसाठी ही गैरसोयीची वेळ टाळण्यासाठी यापुढे संबंधित दिवशी व वीजवाहिनीच्या पूर्वनियोजित देखभाल व दुरुस्तीचे काम यापुढे सकाळी ७ ते ११ वाजेदरम्यान करण्याचे निर्देश मुख्यालयाकडून देण्यात आले आहे. महावितरणच्या देखभाल दुरुस्तीचे पूर्वनियोजित कामे करताना सर्वप्रथम प्राधान्याने पर्यायी वीजपुरवठा उपलब्ध करून देण्याचे तसेच संबंधित वीजग्राहकांना नोंदणीकृत मोबाईल क्रमांकावर ‘एसएमएस’द्वारे तसेच प्रसिद्धी माध्यमांद्वारे कळविण्याचे निर्देश देण्यात आले आहे.

मान्सूनपूर्व देखभाल व दुरूस्तीच्या पूर्वनियोजित कामांमध्ये प्रामुख्याने वीजवाहिन्यांना स्पर्श करणाऱ्या झाडांच्या छोट्या फांद्या तोडणे, तूटलेले पीन व डिस्क इन्सूलेटर्स बदलणे, वितरण रोहित्रे, फिडर पिलर, रिंगमेन युनिटचे अर्थिंग तपासणे, ऑइल फिल्टरेशन व ऑइल टॉपिंग अप, रोहित्राच्या वितरण पेटीची दुरुस्ती, नादुरुस्त लाईटनिंग अरेस्टर बदलणे, वीजखांब व तारांचे मजबुतीकरण, तारांमधील झोल काढणे, गंजलेले किंवा खराब झालेले वीजखांब बदलणे, जुन्या वीजतारा बदलणे, फिडर पिलरची साफसफाई व आवश्यकतेनुसार इन्सूलेशन स्प्रे मारणे, उच्च व लघुदाब वीजतारांना गार्डिंग करणे यासह उपकेंद्रातील ब्रेकर्सची दुरुस्ती, बॅटरी चार्जिंग, पॉवर ट्रान्सफॉर्मरची देखभाल व ऑइल टॉपिंग अप अशा व इतर विविध दुरुस्ती कामांसह वीजपुरवठ्याच्या पर्यायी यंत्रणा सज्ज करणे आदी कामे करण्यात येत आहेत.

Share This Article
Leave a Comment

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *