भोस्ते घाटात टेम्पो ट्रॅव्हलरचा ब्रेक फेल होऊन कारला धडक; सुदैवाने मोठी जीवितहानी टळली

saurabhsalvi26@gmail.com
1 Min Read

खेड: मुंबई-गोवा महामार्गावरील खेड तालुक्यातील भोस्ते घाटात रविवारी पर्यटकांच्या टेम्पो ट्रॅव्हलर बसचा भीषण अपघात झाला. कोकण दर्शन करून मुंबईच्या दिशेने परतत असताना टेम्पो ट्रॅव्हलरचे ब्रेक निकामी झाल्याने ही दुर्घटना घडली. या अपघातात बसने समोर असलेल्या एका हुंडाई एक्स्टर कारला पाठीमागून जोरदार धडक दिली. धडक इतकी भीषण होती की कार रस्त्याच्या कडेला असलेल्या खोल खड्ड्यात जाता जाता थोडक्यात बचावली. सुदैवाने, या अपघातात कोणालाही गंभीर दुखापत झाली नसल्याने मोठा अनर्थ टळला असला तरी दोन्ही वाहनांचे मोठे नुकसान झाले आहे.

मिळालेल्या माहितीनुसार, संबंधित टेम्पो ट्रॅव्हलर पर्यटकांना घेऊन मुंबईकडे जात होती. भोस्ते घाटाचा उतार उतरत असताना अचानक बसच्या ब्रेकने काम करणे बंद केले, ज्यामुळे चालकाचे नियंत्रण सुटले आणि बसने पुढच्या कारला जोराची धडक दिली. या अपघातामुळे महामार्गावरील मुंबई वाहिनीवरील वाहतूक काही काळासाठी विस्कळीत झाली होती. घटनेची माहिती मिळताच खेड पोलीस आणि कशेडी महामार्ग पोलिसांनी तातडीने घटनास्थळी धाव घेतली. पोलिसांनी अपघातग्रस्त वाहने बाजूला करून वाहतूक पूर्ववत केली असून, याप्रकरणी पुढील कायदेशीर कार्यवाही सुरू करण्यात आली आहे. घाटातील धोकादायक वळणावर झालेल्या या अपघातामुळे प्रवाशांमध्ये भीतीचे वातावरण पसरले होते.

Share This Article
Leave a Comment

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *