रत्नागिरी : हबीब तन्वीर राष्ट्रीय पुरस्कार विजेते ज्येष्ठ रंगकर्मी सुहास भोळे यांच्या मार्गदर्शनाखाली आयोजित करण्यात आलेली तीन दिवसीय अभिवाचन कार्यशाळा उत्साहपूर्ण वातावरणात संपन्न झाली. जिज्ञासा थिएटर्सच्या माध्यमातून गेली पन्नास वर्षे रंगभूमीची अखंड सेवा करणारे सुहास भोळे यांनी कार्यशाळेत सहभागी शिबिरार्थींना अभिवाचनाचे विविध पैलू अत्यंत प्रभावीपणे उलगडून सांगितले.
अ. के. देसाई हायस्कूलच्या मुख्याध्यापिका अंजली पिलणकर आणि जी. जी. पी. एस.च्या माजी शिक्षिका सई साने यांनी या कार्यशाळेसाठी विशेष पुढाकार घेतला होता. उद्घाटनप्रसंगी बोलताना सुहास भोळे यांनी, “आज वाचन संस्कृती लोप पावत चालली असताना अशा कार्यशाळांमधून सकारात्मक विचार रुजवता येतात,” असे मत व्यक्त केले.
कार्यशाळेदरम्यान शब्दसामर्थ्य, उच्चारशास्त्र, आवाजाचे तंत्र, श्वसनाचे प्रकार, ओंकाराचे महत्त्व तसेच त्याचा मेंदू, मज्जासंस्था आणि शरीरावर होणारा परिणाम याविषयी मार्गदर्शन करण्यात आले. वाचन आणि अभिवाचन यांतील फरक, विविध भावभावना, नवरस, बोलीभाषा आणि शुद्ध लेखनातील उच्चारवैविध्य यांचीही सविस्तर माहिती देण्यात आली. योग्य उच्चारांसाठी वापरल्या जाणाऱ्या अवयवांचा वापर कसा करावा, याचे प्रात्यक्षिकांसह मार्गदर्शन करण्यात आले.
कार्यशाळेत सहभागी शिबिरार्थींकडून स्वलिखित उतारे, नाट्य व कादंबऱ्यांतील निवडक भागांचे अभिवाचन करून घेण्यात आले. अभिवाचनात केवळ आवाज नव्हे, तर स्पष्ट आणि अचूक उच्चार महत्त्वाचे असल्याची जाणीव यावेळी करून देण्यात आली.समारोपप्रसंगी मुख्याध्यापिका अंजली पिलणकर यांनी विद्यार्थ्यांसाठी अशा कार्यशाळा सातत्याने आयोजित करण्याचे आश्वासन दिले. कार्यशाळेतील सर्व सहभागी शिबिरार्थींना प्रमाणपत्र देऊन गौरविण्यात आले.





