१८०० किलोमीटरचा ओमानपर्यंत प्रवास करून डहाणूची ‘धवललक्ष्मी’ रत्नागिरीच्या जवळ

saurabhsalvi26@gmail.com
2 Min Read

रत्नागिरी: रायगड जिल्ह्यातील डहाणू येथून सॅटेलाईट टॅगिंग करून समुद्रात सोडलेले ‘धवललक्ष्मी’ नावाचे ऑलिव्ह रिडले प्रजातीचे कासव तब्बल १८०० किलोमीटरचा रंजक प्रवास पूर्ण करून आता रत्नागिरीच्या दिशेने परतले आहे. गेल्या वर्षी नोव्हेंबर महिन्यात डहाणू समुद्रकिनारी जखमी अवस्थेत सापडलेल्या या कासवावर वन खाते, कांदळवन कक्ष आणि भारतीय वन्यजीव संस्था यांनी यशस्वी उपचार केले होते. पूर्णपणे बरे झाल्यानंतर २० नोव्हेंबर २०२५ रोजी या कासवाला पुन्हा समुद्रात सोडण्यात आले आणि तिथूनच या सागरी सफरीचा श्रीगणेशा झाला. सुरुवातीला डहाणू किनाऱ्यापासून ८० किलोमीटरच्या परिसरात वावरल्यानंतर धवललक्ष्मीने गुजरातच्या सोमनाथ आणि पोरबंदरमार्गे थेट ओमानच्या दिशेने झेप घेतली होती.

फेब्रुवारी हा कासवांचा प्रजननाचा काळ असल्याने ती ओमानमध्येच स्थिरावेल असा अभ्यासकांचा अंदाज होता, मात्र तिथे काही काळ वास्तव्य करून तिने पुन्हा दक्षिणेकडे आपला मोर्चा वळवला. अरबी समुद्रात ३८० मीटर खोलीपर्यंत सूर मारणाऱ्या या कासवाचा वेग ३० मार्च ते ९ एप्रिल दरम्यान काहीसा मंदावला होता, तिथे मुबलक खाद्य उपलब्ध झाल्याने तिने मुक्काम केला असावा असा कयास लावला जात आहे. ९ एप्रिलनंतर तिने आपला परतीचा प्रवास पुन्हा जोमाने सुरू केला असून २० एप्रिल रोजी ती रत्नागिरी किनाऱ्यापासून ८०० किलोमीटर अंतरावर असल्याची नोंद झाली आहे.

कोकण किनारपट्टीवर ऑलिव्ह रिडले या दुर्मिळ प्रजातीच्या संवर्धनासाठी सातत्याने प्रयत्न होत असून, अनेक ठिकाणी ही कासवे अंडी घालण्यासाठी येत असतात. अशा परिस्थितीत धवललक्ष्मी रत्नागिरीतील एखाद्या किनाऱ्यावर अंडी घालण्यासाठी येणार की तिचा हा प्रवास असाच पुढे सुरू राहणार, याकडे आता समुद्री जीव अभ्यासकांसह निसर्गप्रेमींचे डोळे लागले आहेत.

Share This Article
Leave a Comment

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *