गुहागर: अखेर वेळणेश्वरचा तो पोस्टमन बडतर्फ

saurabhsalvi26@gmail.com
2 Min Read

गुहागर: तालुक्यातील वेळणेश्वर येथे कर्तव्यात कमालीचा हलगर्जीपणा करणाऱ्या एका पोस्टमनचा धक्कादायक प्रकार उघडकीस आला असून, संबंधित पोस्टमनला तातडीने सेवेतून बडतर्फ करण्यात आले आहे. गेल्या दीड वर्षांपासून गावात आलेले टपाल नागरिकांना न वाटता स्वतःच्या घरात लपवून ठेवल्याचा आरोप करण थोरात या पोस्टमनवर ठेवण्यात आला आहे. विशेष म्हणजे, या पोस्टमनच्या घरातून टपालाची चक्क दोन पोती भरून पत्रे जप्त करण्यात आली आहेत. यामध्ये बँकांच्या लिलाव नोटिसा, चेकबुके, आधार कार्डे, एटीएम कार्डे, एलआयसी सर्टिफिकेट आणि मुंबई विद्यापीठाची महत्त्वाची शैक्षणिक पत्रे यांचा समावेश असून, हा सर्व प्रकार शुक्रवारी २४ एप्रिल रोजी उघड झाला आहे.

मिळालेल्या माहितीनुसार, वेळणेश्वर पोस्ट कार्यालयात कार्यरत असलेल्या करण थोरात याच्या कामाबाबत गेल्या अनेक दिवसांपासून नागरिकांमध्ये असंतोष होता. टपाल मिळाल्याचा ट्रॅकिंग रिपोर्ट मोबाईलवर येत असूनही प्रत्यक्षात पत्रे हाती पडत नसल्याने ग्रामस्थांनी वेळणेश्वर पोस्टात धाव घेतली होती. नवनियुक्त पोस्टमास्टर प्रसाद दिवाडकर यांच्याकडे तक्रारींचा ओघ वाढल्यानंतर त्यांनी या प्रकरणाची चौकशी केली, मात्र करण थोरातने समाधानकारक उत्तर दिले नाही.

अखेर त्याच्या घरी जाऊन पाहणी केली असता टपालाचा मोठा साठा सापडला. या बेजबाबदारपणामुळे अनेक शेतकऱ्यांना जमिनीच्या मोजणीची फी पुन्हा भरावी लागली, तर बँकांच्या नोटिसा वेळेवर न मिळाल्याने काहींच्या दागिन्यांचा लिलाव झाला आहे. या आर्थिक नुकसानीला जबाबदार कोण, असा संतप्त सवाल आता वेळणेश्वरचे ग्रामस्थ करत असून वरिष्ठ अधिकारी यावर काय ठोस भूमिका घेतात याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.

Share This Article
Leave a Comment

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *