मंडणगडात ‘जलजीवन मिशन’ची गती मंदावली; १०२ गावांत २४ कोटी खर्च होऊनही नागरिक पाण्यासाठी व्याकुळ

saurabhsalvi26@gmail.com
2 Min Read

मंडणगड: केंद्र सरकारच्या जलजीवन मिशन अंतर्गत ‘हर घर जल’ योजनेची मंडणगड तालुक्यात अंमलबजावणी सुरू असली, तरी प्रत्यक्ष कामांचा वेग मात्र अपेक्षेपेक्षा अत्यंत कमी असल्याचे चित्र समोर आले आहे. तालुक्यातील १०२ गावांच्या पाणीपुरवठा योजनांसाठी एकूण ४४.०८ कोटी रुपयांचा भरघोस निधी मंजूर करण्यात आला आहे. मात्र, आतापर्यंत केवळ २४.८६ कोटी रुपये खर्च झाले असून, अनेक गावांमध्ये कामे अद्याप रेंगाळलेली आहेत. योजनेची गती मंदावल्याने भर उन्हाळ्यात ग्रामीण भागातील नागरिकांना तीव्र पाणीटंचाईचा सामना करावा लागत असून, हक्काच्या पाण्यासाठी आजही ग्रामस्थांना रोजची धावपळ करावी लागत आहे.

प्रशासकीय आकडेवारीनुसार, तालुक्यातील १०२ गावांपैकी आतापर्यंत केवळ ६९ गावे ‘हर घर जल’ म्हणून घोषित करण्यात आली आहेत. उर्वरित गावांमध्ये योजनेची कामे विविध तांत्रिक कारणांमुळे रखडली आहेत. जागेची अनुपलब्धता, सुधारित अंदाजपत्रकांना मिळणारा विलंब, प्रशासकीय मान्यतेतील दिरंगाई आणि वाढीव कामांच्या मागणीमुळे जुन्या योजनांमध्ये करावे लागणारे बदल ही कामे मंदावण्याची मुख्य कारणे असल्याचे सांगितले जात आहे. तालुक्यातील दाभट, मुरादपूर, रानवळी आणि गोवळ ही गावे ‘नो डिमांड’ श्रेणीत असली, तरी इतर गावांत मात्र पाण्याची स्थिती गंभीर आहे. विशेषतः भोळवली देवाचा डोंगर, वाल्मिकी नगर आणि कोंडगाव यांसारख्या गावांना सध्या टँकरद्वारे पाणीपुरवठा करण्याची वेळ प्रशासनावर आली आहे.

सध्याच्या प्रगतीचा आढावा घेतल्यास, ७५ टक्क्यांहून अधिक काम झालेली अवघी १० गावे असून, निम्म्याहून अधिक गावे अद्याप शुद्ध पाणीपुरवठ्यापासून वंचित आहेत. अनेक गावांत अजूनही नियमित नळजोडणी झालेली नाही, ज्यामुळे योजनेच्या प्रभावी अंमलबजावणीवर प्रश्नचिन्ह निर्माण झाले आहे. “योजना कागदावर चांगली दिसत असली तरी प्रत्यक्षात कामाची गती खूपच कमी आहे,” अशी भावना स्थानिक नागरिक बिपीन पेंढारी यांनी व्यक्त केली आहे. सर्व गावांना शुद्ध पाणी देण्याचे प्रशासनाचे उद्दिष्ट अद्याप दूर असल्याने नागरिकांमध्ये तीव्र नाराजी पसरली असून, संबंधित विभागाने याकडे तातडीने लक्ष देऊन प्रलंबित कामे पूर्ण करावीत, अशी मागणी आता जोर धरत आहे.

Share This Article
Leave a Comment

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *