दिवा एक्स्प्रेस नियमित, मात्र दादर-रत्नागिरी रेल्वेबाबत प्रशासनाचा दुजाभाव; कोकणवासीयांमध्ये संतापाची लाट

saurabhsalvi26@gmail.com
2 Min Read

खेड: मध्य रेल्वेने उत्तर भारतात जाणाऱ्या विशेष गाड्यांना नियमित करण्याचा धडाका लावला असतानाच, कोकणवासीयांच्या जिव्हाळ्याचा ‘दादर-रत्नागिरी’ गाडीचा प्रश्न मात्र जाणीवपूर्वक प्रलंबित ठेवला जात असल्याचा आरोप प्रवाशांकडून होत आहे. राज्यांतर्गत मेल-एक्स्प्रेसचा प्रश्न बिकट होत असताना रेल्वेच्या या दुजाभावाच्या धोरणामुळे प्रवाशांमध्ये तीव्र नाराजी असून, या विषयावर लोकप्रतिनिधींचा आवाज दिल्लीत कमी पडत असल्याची भावना व्यक्त होत आहे. उन्हाळी सुट्ट्यांमुळे सध्या रेल्वे स्थानकांवर प्रचंड गर्दी असून कोकण मार्गावरील गाड्यांच्या विलंबाचा प्रश्नही गंभीर झाला आहे. वेळापत्रक कोलमडल्याने प्रवाशांचे नियोजन बिघडत असताना रेल्वेने ‘दिवा-सीएसएमटी-दिवा’ ही साप्ताहिक विशेष गाडी २४ डब्यांसह नियमित केली आहे, मात्र त्याच वेळी कोकणातील प्रवाशांच्या मागणीकडे सोयीस्कर दुर्लक्ष केले जात आहे.

एकीकडे कोल्हापूर, भुसावळ, पुणे आणि नांदेड यांसारख्या शहरांना मुंबईशी जोडणाऱ्या किमान ३० एक्स्प्रेस बंद करण्यात आल्या आहेत. या परिस्थितीवर भाष्य करताना रेल्वे अभ्यासक अक्षय महापदी यांनी सांगितले की, मध्य रेल्वे राज्यातील गाड्यांना मुंबईत प्रवेश नाकारून परराज्यातील गाड्यांना प्राधान्य देत आहे. या अन्यायाविरोधात दादर येथे ‘महाराष्ट्र रेल्वे परिषद’ देखील आयोजित करण्यात आली आहे. विशेष म्हणजे, लोकल गाड्यांना अडथळा ठरत असल्याचे तांत्रिक कारण पुढे करून ‘दादर-रत्नागिरी’ गाडी रद्द करून ती दिवा येथून चालवण्यात आली, परंतु त्याच वेळी ‘दादर-गोरखपूर’ सारख्या लांब पल्ल्याच्या गाड्यांना मुंबईत कशी परवानगी मिळते, असा सडेतोड सवाल आता विचारला जात आहे. रेल्वेमंत्री अश्विनी वैष्णव यांनी यापूर्वी व्यवहार्यता तपासण्याच्या सूचना देऊनही प्रशासकीय पातळीवर कोणतीही हालचाल न झाल्याने कोकणवासीयांची प्रतीक्षा अजूनही संपलेली नाही.

Share This Article
Leave a Comment

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *