अंत्योदय कार्डधारकांना रेशन दुकानातून मिळणार मोफत साडी; रत्नागिरी जिल्ह्यातील ३४ हजार महिलांना मिळणार लाभ

saurabhsalvi26@gmail.com
1 Min Read

रत्नागिरी: राज्य शासनाच्या वस्त्रोद्योग धोरणांतर्गत राबवल्या जाणाऱ्या ‘एक साडी प्रति कुटुंब’ या योजनेमुळे जिल्ह्यातील गरजू कुटुंबांना मोठा दिलासा मिळणार असून, यंदा अंत्योदय रेशनकार्डधारकांना धान्यासोबतच मोफत साडीचे वाटप केले जाणार आहे. गेल्या वर्षी जिल्ह्यातील २८ हजार १६३ महिलांना या योजनेचा लाभ मिळाला होता, मात्र यंदा ही व्याप्ती वाढवून तब्बल ३४ हजार ६१० महिलांना साडी वाटप करण्याचे उद्दिष्ट ठेवण्यात आले आहे. विशेषतः लग्नसराई आणि सणासुदीच्या दिवसांत गरिबांना कपड्यांवर होणारा खर्च परवडणारा नसल्याने, शासनाचा हा निर्णय ग्रामीण आणि शहरी भागातील अत्यंत गरीब व निराधार कुटुंबांसाठी आर्थिक आधार ठरणार आहे.

ही योजना प्रामुख्याने पिवळे रेशन कार्ड असलेल्या समाजातील दुर्बल घटकांसाठी असून, साडी वाटप प्रक्रियेत पूर्ण पारदर्शकता राहावी यासाठी प्रशासनाने चोख व्यवस्था केली आहे. लाभार्थ्यांना रेशन दुकानावर धान्याप्रमाणेच अंगठा (e-KYC) लावणे अनिवार्य असेल, त्यानंतरच साडीची नोंद होऊन ती संबंधित महिलेला दिली जाईल. जिल्हा पुरवठा विभागाने दिलेल्या माहितीनुसार, गेल्या वर्षी ७४ टक्के साड्यांचे वितरण यशस्वीरीत्या पूर्ण झाले होते. यंदा मागणीत वाढ झाली असून ३४ हजार ६१० साड्यांच्या वितरणाची तयारी प्रशासनाने पूर्ण केली आहे. या निर्णयामुळे ऐन महागाईच्या काळात हजारो महिलांच्या घरचा कपड्यांचा खर्च वाचणार असून, रेशनिंगच्या दुकानातून आता धान्यासोबत सन्मानही मिळणार आहे.

Share This Article
Leave a Comment

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *