‘अबब! विठोबा बोलू लागला’ नाटकाचा कोकण दौरा; रत्नागिरी, चिपळूण आणि दापोलीत रंगणार प्रयोग

saurabhsalvi26@gmail.com
2 Min Read

पाचल/ नितीश खानविलकर: रंगभूमीवर ३० वर्षांपूर्वी ऐतिहासिक यश मिळवलेले आणि अभिनयाचे सम्राट लक्ष्मीकांत बेर्डे यांनी गाजवलेले ‘अबब! विठोबा बोलू लागला’ हे नाटक नव्या संचात पुन्हा एकदा प्रेक्षकांच्या भेटीला आले असून, आता या नाटकाचा बहुप्रतिक्षित कोकण दौरा दिमाखात सुरू होत आहे. कोकणचे पारसमणी म्हणून ओळखले जाणारे आणि ‘हास्यजत्रा’ फेम अभिनेते प्रभाकर मोरे या नाटकात प्रमुख भूमिकेत असून, त्यांच्या सोबतीला अनेक कसलेले कलाकार व बालकलाकार विठ्ठलाचे दर्शन घडवणार आहेत. या नाटकाचे कोकणातील प्रयोग १ मे रोजी सायंकाळी ६.३० वाजता रत्नागिरीतील स्वा. वि. दा. सावरकर नाट्यगृहात, २ मे रोजी रात्री ९.३० वाजता चिपळूण येथील इंदिरा गांधी सांस्कृतिक केंद्रात आणि ३ मे रोजी रात्री ९.३० वाजता दापोलीतील रसिकरंजन नाट्यमंदिर येथे पार पडणार आहेत. या प्रयोगांची आगाऊ तिकीट विक्री २७ एप्रिलपासून संबंधित शहरांमध्ये सुरू करण्यात आली आहे.

अनेक गाजलेल्या मराठी-हिंदी मालिका आणि चित्रपटांचा दिग्दर्शनाचा दांडगा अनुभव असणारे प्रशांत गिरकर यांनी या नाटकाच्या दिग्दर्शनाची धुरा सांभाळली असून, नमिता वागळे गिरकर यांनी या नाटकाची निर्मिती केली आहे. मूळचे नीलकंठ नांदुरकर यांनी लिहिलेले हे नाटक जरी बालनाट्य म्हणून ओळखले जात असले, तरी ते सर्व वयोगटातील प्रेक्षकांचे निखळ मनोरंजन करणारे आहे. सध्या मुंबई, ठाणे, नाशिक आणि पुणे यांसारख्या शहरांमध्ये या नाटकाला प्रेक्षकांचा उत्स्फूर्त प्रतिसाद मिळत असून सर्व प्रयोग हाऊसफुल्ल होत आहेत. कोकणातील या तीन प्रयोगांनंतर हे नाटक महाराष्ट्र दौऱ्यावर रवाना होणार आहे. रत्नागिरीतील रसिकांनी ९४२००५१२८, चिपळूणसाठी ९४२३२९५३०७ आणि दापोली येथील बुकिंगसाठी ९९२३६८०७५५ या क्रमांकावर संपर्क साधण्याचे आवाहन करण्यात आले असून, कोकणच्या रसिकांनी या दर्जेदार नाटकाचा लाभ घ्यावा, अशी भावना निर्मात्यांनी व्यक्त केली आहे.

Share This Article
Leave a Comment

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *