GRAMIN SEARCH BANNER

रत्नागिरीत पोलिसांची धडक कारवाई; गुटख्यासह पावणेसात लाखांचा मुद्देमाल जप्त

Gramin Varta
677 Views

रत्नागिरी: रत्नागिरी शहरात प्रतिबंधित गुटखा आणि पान मसाल्याची तस्करी करणाऱ्या एका इसमावर रत्नागिरी शहर पोलिसांनी आज पहाटे मोठी कारवाई केली. कोल्हापूर येथून मोठ्या प्रमाणात प्रतिबंधित गुटख्याचा साठा विक्रीसाठी रत्नागिरीत येणार असल्याची गोपनीय माहिती विश्वसनीय बातमीदाराकडून पोलिसांना मिळाली होती. या माहितीची दखल घेत वरिष्ठ अधिकाऱ्यांना तातडीने अवगत करण्यात आले.

पोलीस अधीक्षक नितीन बगाटे, अपर पोलीस अधीक्षक महामुनी आणि उपविभागीय पोलीस अधिकारी निलेश माईनकर यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस निरीक्षक विवेक पाटील यांनी या मोहिमेचे नियोजन केले. या कारवाईसाठी पोलीस उपनिरीक्षक सागर शिंदे, राहुल जाधव, रणजित जाधव आणि शरद जाधव यांचे एक विशेष पथक तयार करण्यात आले होते. या पथकाने शहरात सापळा रचून पहाटेच्या सुमारास धडक कारवाई केली.

या कारवाईत पोलिसांनी शरद गणपती भंडारे (राहणार सरूड, तालुका शाहूवाडी, जिल्हा कोल्हापूर) या आरोपीला ताब्यात घेतले आहे. त्याच्याकडून ३,२७,९०४ रुपये किमतीचा प्रतिबंधित गुटखा आणि पान मसाला, तसेच वाहतुकीसाठी वापरलेली ३,५०,००० रुपये किमतीची इको कार, असा एकूण ६,७७,९०४ रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे. रत्नागिरी शहर पोलीस ठाण्यात याप्रकरणी गुन्हा दाखल करण्यात आला असून, पोलीस उपनिरीक्षक सागर शिंदे या घटनेचा पुढील अधिक तपास करत आहेत.

Total Visitor Counter

3348950
Share This Article