रत्नागिरी : जिल्ह्यातील चिपळूण, राजापूर, लांजा आणि रत्नागिरी शहर परिसरात सार्वजनिक रस्त्यावर बेशिस्तपणे वाहने उभी करून वाहतुकीस अडथळा निर्माण करणाऱ्या चार चालकांविरुद्ध पोलिसांनी कडक कारवाई केली आहे. या सर्व प्रकरणांत संबंधित पोलीस ठाण्यांमार्फत भारतीय दंड संहिता कलम २८५ नुसार गुन्हे दाखल करण्यात आले असून, रस्ते सुरक्षा आणि सुरळीत वाहतुकीसाठी ही मोहीम राबवण्यात आली आहे.
चिपळूण तालुक्यातील सावर्डे येथे २१ एप्रिल रोजी दुपारी सावर्डे-पालवण रोडवरील अमृततुल्य हॉटेलसमोर मॅझिमो गाडी (MH-08-AQ-7131) रस्त्याच्या मधोमध उभी करून पादचारी व वाहनांना अडथळा निर्माण केल्याप्रकरणी चालक महेश दत्ताराम दिंडे यांच्यावर सावर्डे पोलीस ठाण्यात गुन्हा नोंद झाला आहे. दुसरी कारवाई राजापूर तालुक्यातील ओणी ते पाचल मुख्य रस्त्यावर करण्यात आली असून, तिथे आपली रिक्षा (MH-08-AQ-1346) धोकादायक स्थितीत उभी करणाऱ्या संदीप परशुराम चव्हाण यांच्यावर गुन्हा दाखल झाला आहे.
लांजा बाजारपेठेत मुंबई-गोवा हायवेवर कोर्ले फाटा येथील बालाजी स्वीट्ससमोर बोलेरो पिकअप (MH-08-AP-1211) उभी करून रहदारीस अडथळा आणल्याप्रकरणी चालक गणेश गणपत लांबोर याच्यावर लांजा पोलिसांनी कारवाई केली. तसेच, रत्नागिरी शहरात तांबट आळी ते धनजी नाका दरम्यान नार्वेकर ज्वेलर्ससमोर टाटा नॅनो कार (MH-43-AF-0198) उभी करून सार्वजनिक रहदारीस अडथळा निर्माण केल्याप्रकरणी अक्षय अरुण तोडणकर याच्यावर रत्नागिरी शहर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. सार्वजनिक रस्त्यांवर अशा प्रकारे बेशिस्तपणे वाहने उभी करणाऱ्यांवर कारवाईचा ससेमिरा यापुढेही सुरूच राहणार असल्याचे संकेत पोलीस प्रशासनाकडून देण्यात आले आहेत.
वाहतुकीस अडथळा निर्माण करणाऱ्यावर कारवाई; चिपळूण, राजापूर, लांजा, रत्नागिरी शहरात गुन्हा दाखल






